प्रतिनिधी /बेळगाव
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवारी शहरातील विविध भागांना भेट दिली. किल्ला येथील कमलबस्ती, रामकृष्ण मिशन आश्रम यासह भुतरामहट्टी येथील प्राणी संग्रहालयालादेखील भेट देऊन वन्यप्राण्यांची पाहणी केली.
म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास साधला जात आहे. तब्बल 41 एकरमध्ये पसरलेल्या या संग्रहालयाचा 50 कोटी निधीतून विकास होत आहे. मागील दोन वर्षात सिंह, वाघ, अस्वल, गवीरेडे, कोल्हे, हरिण, काळवीट, सांबर, तरस आदी वन्यप्राणी दाखल झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी निवारा कोठडीत ठेवलेल्या सिंह, वाघ आणि बिबटय़ाचे दर्शन घेतले. शिवाय प्राणी संग्रहालय आणि वन्यप्राण्यांच्या देखभालीबाबत गौरवोद्गार काढले. यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार आण्णासाहेब जोल्ले, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही., तहसीलदार आर. के. कुलकर्णी आदी उपस्थित होते.