प्रतिनिधी /फोंडा
म्हार्दोळ येथील आझाद मैदानावर फुटबॉल खेळणाऱया गायीचा व्हिडीओ काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजला होता. केवळ गोवाच नव्हे देशभरात समाजमाध्यमांवर तसेच काही प्रसार माध्यमांवरही लोकांनी हे अप्रूप पाहिले होते. अशीच एक गोमाता सध्या बांदोडा येथील श्री महालक्ष्मी मंदिरच्या आवारात भाविकांसाठी कुतुहलाचा विषय बनून राहिली आहे.
काही दिवसांपूर्वी मंदिराच्या सभामंडपात ब्रह्मवृंदातर्फे चाललेल्या एका धार्मिक विधीत चक्क या गोमातेने उपस्थिती लावली. तेथे चाललेले सामुहिक मंत्रपठण जणू ती ऐकत बसली होती. यावेळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी आपल्या मोबाईलवर तिचे फोटो घेऊन शेअर केले आहेत. तिच्याकडे पाहिल्यानंतर जणूकाही ती मंत्रपठण ऐकण्यात दंग असल्याचे भासते. अधिक चौकशी केली असता, गेल्या काही महिन्यापासून या गाईने श्री महालक्ष्मी मंदिराच्या आवारात तळ ठोकल्याचे काही भाविकांनी सांगितले. मुख्य मंदिर व बाजूला असलेल्या इतर मंदिरांच्या पायऱयांपाशी ती बसलेली दिसते. सभामंडपात एखादा धार्मिक विधी सुरु असल्यास कुणीही न बोलावता ती आपण होऊन त्या ठिकाणी हजर होते. त्यामुळे धार्मिक विधी आयोजित केलेल्या यजमानाला या गोमातेच्या उपस्थितीमुळे आपले कार्य सिद्धीस गेल्याचे समाधान निश्चितच लाभते.
हिंदू धर्मात गोमातेच्या पोटी तेहतीस कोटी देव वास करतात अशी धारणा आहे. येथे तर श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी ही गोमाता भाविकांना वेगळय़ाच लीला दाखवित आहे.