महिलेने जीभेचे करविले दोन तुकडे
जग अनोखेपणाने भरलेले आहे. एका महिलेला स्वतःच्या शरीरात परिवर्तन घडविण्याचा मोठा छंद आहे. याच छंदापोटी महिलेने स्वतःच्या जीभेला मधोमध विभाजित करविले आहे. आता ही महिला एकाचवेळी वेगवेगळय़ा गोष्टींची चव घेत आहे.
कॅलिफोर्नियात राहणारी ब्रायना मेरी शिहादेहला वेगळाच छंद आहे. ब्रायनाला एक ड्रेडलॉक कलाकार असून ज्यात शरीरात बदल घडविण्याचा छंद आहे. तिने शस्त्रक्रियेद्वारे स्वतःच्या जीभेचे दोन भाग करविले आहेत. याकरता तिने मोठा खर्च केला आहे.
स्वतःच्या याच प्रयत्नांमुळे आता ती एकाचवेळी दोन वेगवेगळय़ा गोष्टींची चव घेऊ शकते. ब्रायनाने एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकौंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ब्रायना एकाचवेळी स्प्राइट आणि पाणी पिण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. तुम्ही प्रथम कुठले दोन फ्लेवर ट्राय करणार असे तिने कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक जणांनी पाहिले आहे. तसेच या व्हिडिओला 12 हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ पाहून काही युजर्स हैराण झाले असून ते विचित्र प्रकारच्या कॉमेंट्स करत आहेत.
वैद्यकीय शास्त्रानुसार जीभेला दोन भागांमध्ये विभाजित करणे अत्यंत धोकादायक आहे. यामुळे ब्रेन हॅमरेज, इंफेक्शन आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचण्याचा मोठा धोका असतो.