वृत्तसंस्था /गिलाँग (व्हिक्टोरिया)
आयसीसी टी-20 पुरुषांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी येथे झालेल्या प्राथमिक फेरीतील ‘अ’ गटातील सामन्यात संयुक्त अरब अमिरातने नामिबियाचा 7 धावांनी पराभव केला. नामिबिया संघातील मोहम्मद वासीमला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात संयुक्त अरब अमिरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 3 बाद 148 धावा जमविल्या. त्यानंतर नामिबियाने 20 षटकात 8 बाद 141 धावांपर्यंत मजल मारली.
संयुक्त अरब अमिरातच्या डावामध्ये सलामीचा फलंदाज मोहम्मद वासीमने 41 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 50, व्ही. अरविंदने 32 चेंडूत 2 चौकारांसह 21, कर्णधार सी. रिझवानने 29 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 43, बसिल हमीदने 14 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 25 धावा जमविल्या. रिझवान आणि हमीद यांनी चौथ्या गडय़ासाठी 35 धावांची भर घातली. संयुक्त अरब अमिरातच्या डावात 6 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. नामिबियातर्फे वीजे, स्कोल्ट्झ आणि शिकोंगो यांनी प्रत्येक 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना नामिबियाच्या डावात डेव्हिड वीजेने एकाकी लढत देत 36 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह 55 धावा जमविल्या. टी. रुबेनने 24 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 25, कर्णधार इरासमूसने 18 चेंडूत 2 चौकारांसह 16, फ्रायलिन्कने 1 चौकारासह 14 आणि लिनगेनने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या. नामिबियाच्या डावात 4 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. संयुक्त अरब अमिराततर्फे बसिल हमीद आणि झहूर खान यांनी प्रत्येकी 2 तर सिद्दिकी, कार्तिक मयप्पन आणि वासीम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
नामिबियाच्या पराभवामुळे नेदरलँड्स संघाने या स्पर्धेच्या सुपर-12 संघातील आपले स्थान निश्चित केले. संयुक्त अरब अमिरातचा टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. आता रविवारपासून सुरू होणाऱया सुपर 12 फेरीतील गट-1 मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अफगाण आणि लंका यांचा समावेश आहे. तर गट-2 मध्ये भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स यांचा सहभाग राहील.
संक्षिप्त धावफलक
संयुक्त अरब अमिरात 20 षटकात 3 बाद 148 (मोहम्मद वासीम 50, व्ही. अरविंद 21, सी. रिझवान नाबाद 43, बसिल हमीद नाबाद 25, वीजे, स्कोल्ट्झ आणि शिकोंगो प्रत्येकी 1 बळी), नामिबिया 20 षटकात 8 बाद 141 (वीजे 55, टी. रुबेन नाबाद 25, इरासमूस 16, फ्रायलिन्क 14, लिनगेन 10, हमीद 2-17, झहूर खान 2-20, मयप्पन, सिद्दिकी आणि वासीम प्रत्येकी 1 बळी).