वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पहिल्याच युनायटेड चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत मॅटेव बेरेटिनीने नॉर्वेच्या कास्पर रुडचा पराभव करत इटली संघाला अंतिम फेरीत नेले. या स्पर्धेत आता इटलीने इ गटातून आघाडीचे स्थान मिळवले आहे. बुधवारी या स्पर्धेतील अंतिम लढत होणार आहे. इटली संघाला पोलंड किंवा स्वीत्झर्लंड यापैकी एका संघाबरोबर लढत द्यावी लागेल.
मंगळवारी या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात बेरेटिनीने कास्पर रुडचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करून नॉर्वेवर आपल्या संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. नॉर्वेच्या रुडने गेल्या वर्षी एका स्पर्धेत बेरेटिनीचा पराभव केला होता. दुसऱया एकेरी सामन्यात इटलीच्या लुसियाने नॉर्वेच्या इकेरीचा पराभव करून आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. मिश्र दुहेरीच्या सामन्यात इटलीच्या रोसाटेलो आणि लॉरेंझो मुसेटी यांनी इकेरी आणि डय़ुरासोविक यांचा 7-6 (8-6), 6-2 अशा पराभव केला. या संपूर्ण लढतीत इटलीने नॉर्वेचे आव्हान 5-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले.
पर्थमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील एका लढतीत कॅरोलिन गार्सियाने मार्टिकचा पराभव करत फ्रान्सचे आव्हान जिवंत ठेवले आहे. फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यातील ही लढत सुरू आहे. फ्रान्सच्या गार्सियाने एकेरीच्या सामन्यात मंगळवारी क्रोएशियाच्या पेत्रा मार्टिकचा 7-6(9-7), 6-4 असा पराभव केला. या विजयामुळे फ्रान्सने या स्पर्धेतील आव्हान जीवंत ठेवले आहे. तत्पुर्वी क्रोएशियाने सोमवारी फ्रान्सवर 2-0 अशी आघाडी मिळवली होती. क्रोएशियाच्या डोना व्हेकीक आणि कोरीक यांनी आपले सामने जिंकले होते.