मतदार यादी दुरूस्तीनंतर 36343 पदवीधर मतदार पात्र; 12 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ निवडणूक प्रक्रियेतील तिसरा टप्पा म्हणजे मतदारांच्या आलेल्या तक्रार अर्जांची पडताळणी आणि योग्य दुरूस्त्या करून 1 ऑक्टोबर रोजी दुरूस्त मतदार यादी मध्यरात्री 12 वाजता जाहीर झाली. दुरूस्त यादीनुसार 36343 पदवीधर मतदार पात्र ठरले आहेत. 6 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुरूस्त मतदारयादीसंदर्भात काही आक्षेप असल्यास कुलगुरूंकडे तक्रार करायची आहे. 12 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिध्द होईल.
विद्यापीठ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक आणि आवक-जावक विभागातील कर्मचाऱयांनी सुट्टीच्या दिवशीही काम करून मतदारांच्या दुरूस्त्या व आक्षेप अर्ज स्विकारले. या अर्जांची छाननी करून दुरूस्त मतदार यादी शनिवारी मध्यरात्री जाहीर केली. या दुरूस्त मतदार यादीसंदर्भात आलेल्या अर्जांची छाननी करून अंतिम मतदार यादी 12 ऑक्टोबरला जाहीर होईल. 14 ऑक्टोबरला निवडणूक सूचना प्रसिध्द होईल. 31 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी करून वैध, अवैध उमेदवारी अर्ज जाहीर होतील. 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यावयाचे आहेत. 2 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत उमेदवारी अर्जांच्या वैधतेबाबत कुलगुरूंकडे तक्रार करावी. 3 नोव्हेंबर रोजी अंतिम पात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द होईल. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मतदान होईल. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून निकाल जाहीर होईल.
निवडणूकीसाठी संघटनांची मोर्चेबांधनी
प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, महाविद्यालयीन, विद्यापीठ प्राध्यापक, नोंदणीकृत पदवीधर अधिसभा सदस्य, विद्यापरिषदेवर, अभ्यासमंडळ, आदी पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे विद्यापीठ विकास आघाडी, सुटा आणि शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी संघटनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार आपआपल्या परीने मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्यक्ष मतदान दीड महिन्यानंतर असले तरी प्रचारात संघटनांमध्ये चुरस पाहायला मिळतेय.
अधिकार मंडळानुसार पात्र उमेदवारांची संख्या
पद संख्या
पदवीधर 36343
शिक्षक मतदार संघ 2953
बीओएस महाविद्यालय विभागप्रमुख 937
प्राचार्य मतदार संघ 93
संस्थाचालक मतदार संघ 117