डॉ. प्रमोद सरमोकादम : ‘गोव्यातील देववृक्ष’चे प्रकाशन
प्रतिनिधी /पणजी
पर्यावरणीय अभ्यासक राजेंद्र केरकर हे गोव्याला लाभलेले रत्न आहे. त्यांनी आजपर्यंत जे अनुभवले, सोसले ते नेहमीच आपल्या पुस्तकांतून, लेखातून व्यक्त केले आहे. संस्कृती, परंपरा व पर्यावरण सुरक्षीत राहण्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे अतुलनीय असेच आहे. राजेंद्र केरकर हे पर्यावरण अनुभवाचे विद्यापीठ आहे, असा शब्दांत डॉ. प्रमोद सरमोकादम यांनी गौरवोद्गार काढले.
गोव्यातील पवित्र देववृक्ष या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी नाबार्डचे अध्यक्ष विजय देशपांडे, चंद्रकांत शिंदे व पर्यावरण अभ्यासक तथा लेखक राजेंद्र केरकर बोलत होते.
डॉ. सरमोकादम म्हणाले, गोव्यात अनेक प्राचीन गोष्टी आजही पहायला मिळतात. याचे कारण म्हणजे आमच्या पूर्वजांनी निसर्गाशी एकरूप होऊन येथील संस्कृती व परंपरा टिकविण्याचे महान कार्य केले. आजही निसर्गातील विविध वनस्पती ही आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. ग्रामीण भागातील मंदिरासमोर असणारी झाडे ही देववृक्ष म्हणून ओळखली जातात आणि त्याचाच मागोवा व महत्त्व गोव्यातील पवित्र देववृक्ष या पुस्तकातून घेतलेला असल्याचे पहायला मिळते. हे पुस्तक म्हणजे अनुभवाचा खजिना असून, ते भावीपिढीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.
विजय देशपांडे म्हणाले, पर्यावरण रक्षण आणि जागृतीच्या कामात अग्रेसर असलेले पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी चालवललेली पर्यावरण जागृतीची मोहीम फार मोलाची आहे. या मोहिमेला बळ येण्यासाठी सर्वांनीच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. जैवविविधता मंडळामार्फत पर्यावरणातील बदलावर काम करण्यात येत असून, या कामासाठी युवकांनीही साथ द्यावी, असे म्हणाले.
चंद्रकांत शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नारायण गावकर व समृद्धी केरकर यांनी सूत्रसंचालन केले.
देववृक्षाची परंपरा टिकणे गरजेचे
दुर्वा, बेल, तुळस या वनस्पतींना जेवढे आपल्या धार्मिक कार्यात महत्त्व आहे, तितकेच या वनस्पतींचे महत्त्व आपल्या जीवनात आहे. कारण ही केवळ वनस्पती नसून, आपले जीवन आहे. गोव्यातील मंदिरांसमोर आजही दृष्टीस पडणारी वड, पिंपळ आदी प्रकारची झाडे ही देववृक्ष आहेत. या देववृक्षांची परंपरा टिकणे गरजेचे आहे. म्हापशातील देव बोडगेश्वर येथील झाड असो वा पिर्ण येथे असणारे ‘हुरो’ वृक्ष असो अशा प्रकारची देववृक्ष आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतात. या पवित्र झाडांची माहिती प्रकाशित व्हावी आणि देववृक्षांची संस्कृता,r परंपरा टिकावी यासाठी गोव्यातील पवित्र देववृक्ष हे पुस्तक प्रकाशनामागील उद्देश असल्याचे राजेंद्र केरकर यांनी सांगितले.