वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युवा बॅडमिंटनपटू अनुपमा उपाध्याय बीडब्ल्यूएफ ज्युनियर मानांकनात अग्रस्थान मिळविणारी 19 वर्षांखालील वयोगटातील दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू बनली आहे.
पंचकुलाच्या या 17 वर्षीय खेळाडूने यावर्षी युगांडा व पोलंड येथे झालेल्या कनिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या. तिने आपल्याच देशाच्या तसनिम मिरला मागे टाकत ताज्या मानांकनात अग्रस्थान पटकावले. तिने दोन स्थानांची प्रगती करीत ही झेप घेतली. तिचे 18 स्पर्धांतून 18.060 गुण झाले असून ज्युनियर मानांकनात टॉप टेनमधील चार भारतीय मुलींपैकी ती एक आहे. तिच्याशिवाय तसनिम मिर दुसऱया, 14 वर्षीय अन्वेशा गौडा व उन्नती हुडा अनुक्रमे सहाव्या व नवव्या स्थानावर आहेत. ज्युनियर मानांकनात अग्रस्थान पटकावणारी ती एकूण सहावी भारतीय खेळाडू आहे. मुलांमध्ये आदित्य जोशी (2014), सिरिल वर्मा (2016), लक्ष्य सेन (2017) यांनी यापूर्वी अग्रस्थान पटकावले होते तर 18 वर्षीय शंकर मुथुसामी सुब्रमण्यमने गेल्या महिन्यात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविले आहे.
अनुपमाने अलीकडेच वरिष्ठ महिला विभागात टॉप 100 मध्ये स्थान मिळविले असून ती सध्या जागतिक क्रमवारीत 63 व्या स्थानावर आहे. अनुपमा ही प्रकाश पडुकोन अकादमीची सदस्य आहे. तिने यावर्षी शानदार प्रदर्शन केले असून जानेवारीतील सईद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर 300 स्पर्धेत तिने उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर अर्लीन्स ओपन सुपर 100 स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. सध्या ती ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करीत असून स्पेनमधील सान्तांदर येथे 17 ऑक्टोबरपासून त्याची सुरुवात होणार आहे.