Tarun Bharat

काणकोणातील ‘लोकोत्सव – 22’ला अभूतपूर्व प्रतिसाद

आज राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन, महिला सशक्तीकरण, रोजगार जागृती मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध भागांत लोकनृत्य सादरीकरण

प्रतिनिधी / काणकोण

‘लोकोत्सव-22’ला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळायला लागला आहे. यंदा प्रथमच पाच दिवसांच्या महोत्सवाचे आयोजन करताना आदर्श युवा संघाचे संस्थापक असलेल्या सभापती रमेश तवडकर यांनी आपली संघटनशक्ती आणि कौशल्य वापरून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. मागच्या जवळजवळ दोन महिन्यांपासून संपूर्ण गोव्यात लोकोत्सवाच्या जागृतीसाठी बैठका घेण्याशिवाय यंदा प्रथमच महिला सशक्तीकरण आणि युवकांसाठी खास कार्यक्रम आयोजित करून या दोन्ही गटांसाठी त्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे.

लोकोत्सव हा नुसता महोत्सव नसून तो एक विचार आहे याची जाणीव सर्वसामान्य जनतेला, खास करून महिला आणि युवकांना करून देताना 7 रोजी आयोजित पेंलेल्या महिला सशक्तीकरण कार्यक्रमाला जसा प्रतिसाद मिळाला तसाच प्रतिसाद युवकांसाठी आयोजित केलेल्या रोजगार जागृती मेळाव्याला मिळाला. यापैकी सांख्यिकी व नियोजन संचालनालय आणि आदर्श युवा संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन सभापती रमेश तवडकर यांच्यासमवेत सुलक्षणा सावंत यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय सक्सेना, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई उपस्थित होते. गोव्याच्या विविध भागांतून आलेल्या महिलांनी यावेळी विविध लोककला प्रकार सादर केले. महिला सशक्तीकरणासंबंधी सरकारकडे असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी महिलांना करून देण्यात आली. या मेळाव्याचे सूत्रसंचालन योगिनी आचार्य यांनी केले, तर सविता तवडकर यांनी आभार मानले. यावेळी महिलांचे ढोल पथक, लेझीम पथक यांचे सादरीकरण झाले तसेच वेशभूषा, रांगोळी, वेणी व चित्रकला यासारख्या स्पर्धा घेण्यात आल्या.

8 रोजी आयोजित केलेल्या रोजगार जागृती मेळाव्याला युवकांची लक्षणीय अशी उपस्थिती राहिली. सभापती तवडकर यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, सरपंच आनंदू देसाई, सरपंच सविता तवडकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी ताज हॉटेल व्यवस्थापनाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष विन्सेंत रामोस यांनी हॉटेल व्यवस्थापनात युवकांना असलेल्या संधीवर, गॅनोर्ग इन्फोटेकचे सीईओ मिलिंद प्रभू यांनी करिअरच्या संधींवर तसेच गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे साहाय्यक रजिस्ट्रार मिलिंद्र वेळीप, काणकोणच्या सीडीपीओ आशंका गावकर, रिवणच्या सरपंच वैशाली नाईक, आदिवासी कल्याण खात्याच्या संचालिका त्रिवेणी वेळीप यांनी मार्गदर्शन केले. आनंदू देसाई, रमाकांत ना. गावकर यांनीही विचार व्यक्त केले.

आज लोकोत्सवाचे उद्घाटन

लोकोत्सवाचे प्रमुख कार्यक्रम आज 9 पासून सुरू होत असून 11 रोजी त्याची सांगता होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होणार असून तीन दिवसांतील विविध कार्यक्रमांना केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा, केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार, केंद्रीय मंत्री फगनसिंग कुलस्ते, महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गोव्याचे अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत.

आगोंद, पाळोळे येथे लोकनृत्य सादरीकरण

लोकोत्सवाचा एक भाग म्हणून पहिल्यांदाच देशी-विदेशी पर्यटकांसाठी खास रोमटामेळ आणि विविध राज्यांतील लोकनृत्य पथकांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. पारवे, आगोंद येथून सुरू केलेल्या रोमटामेळ मिरवणुकीचा सभापती तवडकर यांनी सरपंच फातिमा रॉड्रिग्स, अन्य पंचायत सदस्य आणि भाजपाच्या मंडळ समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शुभारंभ केला. ही रोमटामेळ मिरवणूक बोरी पूल, धवलखाजनमार्गे आगोंद किनाऱ्यावर येऊन तेथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी आगोंदच्या चर्चजवळ उभारलेल्या खास मंडपात देशाच्या विविध भागांतून आलेल्या लोकनृत्य पथकांचा बहारदार कार्यक्रम झाला.

काणकोण पालिका क्षेत्रातील पाळोळे किनाऱ्यावर खास उभारलेल्या मंडपातही विविध राज्यांतील लोकनृत्य पथकांचे कार्यक्रम झाले. त्यापूर्वी चार रस्ता ते पाळोळे किनाऱ्यापर्यंत रोमटामेळ व लोकनृत्य पथकांची मिरवणूक काढण्यात आली. सभापती तवडकर, नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर आणि अन्य नगरसेवकांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याशिवाय लोकोत्सवानिमित्त पारंपरिक औषधी वनस्पती, पारंपरिक खाद्यपदार्थ, मातीकाम, कृषी अशा प्रदर्शनांबरोबर विविध देशी खेळ, क्रीडास्पर्धा, साहसी उपक्रम यांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे.    

उद्या माशे येथे लोकनृत्य सादरीकरण

माशे येथील गॉड्स गिफ्ट सभागृहातही 10 रोजी रात्री 8 वा. देशाच्या विविध भागांतून आलेल्या सांस्कृतिक पथकांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. सभापती रमेश तवडकर यांनी लोकोत्सव हा सर्वसमावेशक व्हावा या उद्देशाने प्रथमच अशा कार्यक्रमांचे विविध भागांत आयोजन केले आहे. लोलयेच्या सरपंच प्रतिजा बांदेकर आणि अन्य पंचायत सदस्य, आदर्श युवा संघाचे पदाधिकारी तसेच भाजपाच्या मंडळ समितीचे सदस्य वरील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

आदर्श युवा संघ, बलराम शिक्षणसंस्था व कला आणि संस्कृती संचालयानलय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या तीन दिवसांच्या महोत्सवाचा समारोप 11 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या गोव्याच्या विविध भागांतील जवळजवळ 60 जणांचा या तीन दिवसांत मानपत्रे देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लोकोत्सवात घेतलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.

Related Stories

आगोंद किनाऱयावर कमर्शियल झोन कासव संवर्धनावर संकटाची भीती

Amit Kulkarni

मोले वीज प्रकल्प संपूर्ण गोव्यासाठी आवश्यक

Patil_p

सरकारी खात्यांत 10 हजार पदे भरणार

Amit Kulkarni

कारागृहात अमली पदार्थ पुरविल्याप्रकरणी योगेश पागीला अटक

Patil_p

सातवा भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सव आजपासून सुरू

Amit Kulkarni

खून प्रकरणी आरोपीला जन्मठेप

Patil_p