ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
उत्तर प्रदेश आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकिय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. मतदानकर्त्यांना प्रभावीत करण्यासाठी राजकिय पक्षांनी कंबर कसली आहे. आप – आपल्या अजेंड्यानुसार पक्ष पुढील आखणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने मोठी घोषणा केली असून दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी पत्रकारपरिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आल्यास उत्तर प्रदेश जनतेला ३०० यूनिट पर्यंत मोफत वीज दिली जाईल, असं सिसोदिया यांनी स्पष्ट केलं आहे.
या घोषणेचं ट्वीट करत सिसोदिया यांनी वीज बिलातुन नागरिकांना काहीशी मुक्ती देण्यासाठी एक महत्वपूर्ण घोषणा करत असल्याचे स्पष्ट केले आहे. आम आदमी पार्टीचं सरकार आल्याच्या २४ तासांत प्रत्येक व्यक्तीस घरगुती वापरासाठी ३०० यूनिट पर्यंत मोफत वीज मिळेल असे म्हटले आहे. याबरोबरच जुने वीज बील माफ केले जाईल, प्रत्येक घरी २४ तास वीज मिळेल, यासाठी वीज पुरवठा करण्याचे नियोजन शासन करणार, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन ही आम आदमी पार्टीकडून देण्यात आलेलं आहे.