जत/प्रतिनिधी
UP Saints Beating In Sangli : महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या जत तालुक्यातील लवंगा येथे चार साधूंना गाडीतून ओढून पट्ट्याने, काठीने मारहाण केल्याची निंदनीय घटना घडली आहे. यावेळी आम्ही साधू असल्याचे विजापूरला जात असल्याचे सांगूनही जमावाने न ऐकल्याने साधू मारहाणीत गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत रात्री पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.सदरच्या प्रकाराने खतरजमा न करता मारहाण केल्याने वारकरी संप्रदायातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उत्तर प्रदेश येथील वाराणसी येथून चार साधू कर्नाटक येथे देवदर्शनासाठी गेले होते. कर्नाटक येथील देवदर्शन आटपून ते लवंगा मार्गे विजापूर येथे जात होते. दरम्यान, रस्त्यात गाडी थांबवून विजापूरला जाण्यासाठी रस्ता कोणता आहे याबाबतची विचारणा त्यांनी एका विद्यार्थीस केली. यावेळी येथील लोकांनी पोरे चोरणारी टोळी समजून चारही साधूना गाडीतून ओढून काठीने ,पट्ट्याने मारहाण केली. सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तालुक्यात सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यावेळी साधूंनी आपले ओळखपत्र, आधार कार्ड याबाबतची सविस्तर माहिती जमावाला देऊन ही जमावाने न ऐकल्याने हा प्रकार घडला. यातील जखमी झालेले साधू वाराणसी येथील प्रसिद्ध महालिंगेश्वर मंडलातील आहेत.
हे ही वाचा : साधू मारहाण प्रकरणी ६ जणांना अटक, भाजपकडून निषेध
रात्री उशिरापर्यंत पोलिसात याबाबत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. याबाबत पोलिसाशी अधिक संपर्क साधला असता साधू यांची ओळखपत्रावरून खातरजमा करण्यात आली आहे. ते साधू व वारकरी संप्रदायातील व्यक्ती असल्याचे पोलीस विभागाने यास दुजोरा दिला आहे. परंतु याबाबत त्यांची कोणतीही तक्रार नसल्याने नोंद झाली नसल्याचे म्हटले आहे.