वृत्तसंस्था/ हैद्राबाद
विवो पुरस्कृत नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील मंगळवारी येथे युपी योद्धाज आणि गुजरात जायंट्स यांच्यातील महत्त्वाचा सामना होणार आहे. या सामन्यात युपी योद्धाजचे खेळाडू गुजरात जायंट्सला मागे टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेतील हा 93 वा सामना राहील.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात युपी योद्धाजचा संघ पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्या हा संघ गुणतक्त्यात 45 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर गुजरात जायंट्सने गुणतक्त्यात अकरावे स्थान मिळविले आहे. त्यांना केवळ 13 गुण आतापर्यंत मिळविता आले आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत युपी योद्धाज आणि गुजरात जायंट्स यांच्यात आठ वेळा लढती झाल्या असून केवळ एकदा युपी योद्धाजने विजय मिळविला आहे. तर दोनवेळा त्यांचे सामने बरोबरीत राहिले आहेत. कर्णधार प्रदीप नरवाल, रोहित तोमर, सुरिंदर गिल यांच्या कामगिरीवरच युपी योद्धाजचे यश अवलंबून राहील. प्रदीप नरवालने या स्पर्धेत आतापर्यंत सहा सामन्यातून 63 गुण मिळविले आहेत.