वाय प्लसवरून झेड श्रेणीची सुरक्षा
वृत्तसंस्था/ पाटणा
संयुक्त जनता दलातून बाहेर पडत राष्ट्रीय लोक जनता दल स्थापन करणाऱ्या उपेंद्र कुशवाह यांना केंद्र सरकारने भेट दिली आहे. केंद्र सरकारने कुशवाह यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. आयबीचा अहवाल प्राप्त झाल्यावर रालोजद चे अध्यक्ष कुशवाह यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. आयबीचा अहवाल प्राप्त झाल्यावर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
माजी केंद्रीय मंत्री कुशवाह यांना सीआरपीएफचे कमांडो झेड श्रेणीची सुरक्षा देणार आहे. कुशवाह यांना ही सुरक्षा बिहार आणि दिल्लीत असताना ही सुरक्षा मिळणार आहे. झेड श्रेणीच्या सुरक्षाव्यवस्थेत कुशवाह यांच्या निवासस्थानी 10 शस्त्रसज्ज स्टॅटिक गार्ड, 24 तास 6 पीएसओ, तीन पाळ्यांमध्ये 12 सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो, एका शिफ्टमध्ये दोन वॉचर्स आणि तीन प्रशिक्षित चालक 24 तास तैनात राहणार आहेत.
कुशवाह यांनी फेब्रुवारी महिन्यात संजदमधून बाहेर पडत नवा पक्ष स्थापन केला होता. यानंतर मार्च महिन्यात त्यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस श्रेणीची सुरक्षा पुरविण्यात आली होती. आता या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करत झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने अलिकडेच विकासशील इन्सान पक्षाचे नेते मुकेश सहनी यांना वाय प्लस आणि लोकजनशक्ती (रामविलास) पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांना झेड श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. या नेत्यांना देण्यात आलेल्या सुरक्षेला आगामी लोकसभा निवडणुकीशी जोडून पाहिले जात आहे.