विमा सुगम प्लॅटफॉर्मची रचना प्रगतीपथावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विमा क्षेत्रामध्ये होणाऱया व्यवहाराकरीता आता नवी प्रणाली येऊ पाहाते आहे. युपीआयप्रमाणेच ही नवी सेवा आणण्याचा विचार सरकारचा असल्याचे सांगितले जात आहे.
विमा सुगम या नव्या इरडाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसंदर्भात विकासाचे कार्य सुरू असून या मार्फत आगामी काळामध्ये युपीआयसारखे व्यवहार विमा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया ग्राहकांना, पॉलिसीधारकांना करता येणार आहेत. ब्रोकरचे 40 टक्के इतके कमिशन यामुळे वाचणार आहे. विम्यासंदर्भातली देयक प्रणाली सुलभ आणि सोयीस्कर करण्याच्या हेतूने नव्या प्लॅटफॉर्मचा विकास केला जात आहे. या प्लॅटफॉर्मवर पॉलिसीज खरेदीसह इतर सुविधाही वापरता येणार आहेत. विमा एजंट व ब्रोकरची भूमिका कमी राहणार आहे.
यासंदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया
विमा खर्चात बचत
नव्या प्लॅटफॉर्मचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विमा रक्कमेसाठी येणारा खर्च कमी होणार आहे. विमा ब्रोकरचे 30 ते 40 टक्के कमिशन जे सध्या दिले जाते ते या नव्या व्यवस्थेमुळे फक्त 5 ते 8 टक्के इतकेच त्यांना घेता येणार आहे. त्यामुळे प्रिमियम सुलभ हप्त्याचा होणार आहे.
योग्य पॉलिसी निवडणे सोपे
या प्लॅटफॉर्मवर सर्व कंपन्यांच्या पॉलिसी उपलब्ध होणार असून त्यातून आपल्याला आवडीच्या कंपनीची पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय खुला असणार आहे.
क्लिकवरती क्लेम सेटलमेंट
या प्लॅटफॉर्मअंतर्गत पॉलिसी नंबरच्या माध्यमातून कोणत्याही कागदपत्रांविना विम्याचा दावा (क्लेम सेटलमेंट) करता येऊ शकणार आहे.
तक्रारींचे तातडीने निवारण
विमा सुगम पोर्टलचा वापर पॉलिसीधारकांसह एजंट, वेबऍग्रिगेटर आणि इतर विमा मिडिएटर हेही करू शकणार आहेत. यामुळे ग्राहकांच्या विम्यासंदर्भातल्या तक्रारींचे निवारण लवकरात लवकर होऊ शकणार आहे.