तीन बँकांकडून सुविधा सुरु ः ऑनलाईन पेमेन्ट सेवा होणार सुलभ
नवी दिल्ली
आता तुमचे क्रेडिट कार्डदेखील युपीआयसोबत लिंक केले जाऊ शकते. त्यामुळे आगामी काळातील आर्थिक युपीआय प्लॅटफॉर्मच्या मदतीने व्यवहार सुलभ होण्याचे संकेत आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये युपीआय नेटवर्क्सच्या मदतीने रुपे क्रेडिट कार्ड सादर केले आहे.
आत्तापर्यंत, फक्त डेबिट कार्ड आणि बँक खात्याच्या युपीआय नेटवर्कशी जोडली जाऊ शकत होती, परंतु सध्या पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या तीन बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे.
द्यावे लागणार इंटरचेंज शुल्क
पंजाब नॅशनल बँकेचे एमडी आणि सीईओ अतुल कुमार गोयल यांनी म्हटले आहे की युपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक करून युपीआय पेमेंट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे एमडीआर शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, एक लहान इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. मात्र ते किती रुपये असणार या संदर्भात कोणाताही खुलासा केलेला नाही.
युपीआय लाइट कियाचे सादरीकरण
आरबीआयने युपीआय लाइट ही सेवा देखील सुरू केली आहे. हे कमी मूल्याच्या व्यवहारांसाठी असेल जे ऑन-डिव्हाइस वॉलेटच्या मदतीने कार्य करेल. युपीआयच्या मदतीने ग्राहक इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकतील यासोबतच युपीआय लाइटसह, 200 रुपयांपर्यंत इंटरनेटशिवाय ट्रान्स्फर केले जाऊ शकतील. याशिवाय भारत बिल पेमेंट सिस्टम अंतर्गत क्रॉस बॉर्डर ट्रान्झॅक्शन सुविधाही सुरू करण्यात आली आहे.