आमदारांच्या बैठकीत एकमत नाही ः काँग्रेस हायकमांड करणार मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब
@ शिमला / वृत्तसंस्था
हिमाचल काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार घमासान सुरू झाले आहे. प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांनी काँग्रेस कार्यालयाला घेराव घालत पक्षनेतृत्त्वावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. प्रतिभा यांना मुख्यमंत्री करण्याची त्यांची मागणी आहे. तसेच आमदारांचा एक गट नाराज असून त्यांनी स्वतंत्र बैठक घेतल्याचीही चर्चा आहे. एकंदर नेता निवडीसाठी पक्षनेतृत्त्वाचा कस लागणार अशी चिन्हे सध्या दिसत आहेत. रात्री उशिरा संपलेल्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदावर एकमत होऊ शकलेले नाही. पक्षनिरीक्षकांच्या अहवालानंतर काँग्रेस हायकमांड नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील, अशी माहिती सूत्रांनी रात्री उशिरा दिली.
राज्यातील सहा नेते मुख्यमंत्रिपदासाठी दावा करत असल्यामुळे पक्षनेतृत्त्वासमोर तिढा निर्माण झाला आहे. राज्यात पूर्ण बहुमताने काँग्रेसची सत्ता आल्यानंतर शुक्रवारी पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला. शुक्रवारी हिमाचलचे प्रभारी राजीव शुक्ला, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवन गाठले तेव्हा नाटय़मय वळण आले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील एकही नेता उपस्थित नव्हता.
नेता निवडीवरील चर्चेसाठी सायंकाळी सहा वाजता होणारी आमदारांची बैठक विलंबाने सुरू झाली. निर्धारित वेळेत केवळ 11 आमदारच काँग्रेस कार्यालयात पोहोचले होते. तसेच दिल्लीतून दाखल झालेले पक्ष निरीक्षकही उशिरापर्यंत हॉटेलमध्येच असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांच्याशिवाय मुख्यमंत्रिपदाचे इतर दोन दावेदार धनीराम शांडिल आणि राजेंद्र राणा बैठकीसाठी काँग्रेस कार्यालयात दाखल झाले होते. याशिवाय केवळ मोहनलाल ब्रक्टा, नंदलाल, हर्षवर्धन चौहान, रोहित ठाकुर, जगतसिंग नेगी, सुंदर ठाकुर, देवेंद्र कुमार भुट्टो आणि आरएस बाली यांच्यासह काही निवडक नवनिर्वाचित सदस्यच बैठकीसाठी वेळेत दाखल झाले होते. तसेच मुख्यमंत्रिपदाचे दुसरे मोठे दावेदार सुखविंदर सुक्खू यांना पाठिंबा देणारे आमदारही एका स्वतंत्र गाडीने बैठकस्थळी दाखल झाले होते. प्रचार समितीचे अध्यक्ष सुखविंदर सुक्खू हे काँग्रेससाठी आव्हान निर्माण करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 18 आमदार त्यांच्यासोबत आहेत. सुक्खू यांनीही मुख्यमंत्री होण्याचा दावा केला आहे. ते प्रतिभा सिंह यांचे कट्टर विरोधकही मानले जातात.