विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात बैठक
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेसह अन्य आवश्यक कामे तातडीने पूर्ण करा, अशा सुचना आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया, भूसंपादन अधिकारी विवेक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शाम कुंभार, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 212 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून सुमारे 1800 खातेदारांची 64 एकर जमिन संपादित करण्यात येणार आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी या बैठकीत आढावा घेतला. कोल्हापूर विमानतळाच्या नाईट लँडिंग आणि धावपट्टी विस्तारीकरणाला देखील मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवल्यास धावपट्टीचे विस्तारीकरण 2300 मीटरपर्यंत करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे ज्या खातेदारांचे पैसे द्यावे लागतात ते तातडीने देण्यासंदर्भात कार्यवाही करा. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
उजळाईवाडी ते विमानतळ मार्गाचे चौपदरीकरण यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मिळण्याकरिता तसेच उजळाईवाडी ते नेर्ली तामगाव हा रस्ता ’नवीन बाह्य वळण रस्ता’ होण्यासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मिळण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. हे दोन्ही विषय मार्गी लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेवून चर्चा करू, असे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.
दरम्यान विमानतळ विस्तारीकरणासाठी ट्रान्समिशन, विद्युत व्यवस्था, अंतर्गत रस्ते आदी विविध विकास कामांचा देखील आमदार पाटील यांनी आढावा घेतला.