तीन दिवस चालणार उरूस : विविध कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : किल्ला येथील हजरत सय्यदिना शेख बद्रोद्दिन आरीफ चिस्ती यांचा 796 व्या उरुसाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. किल्ला येथील नागरिकांनी या दरम्यान दर्ग्याला रंगरंगोटी व सजावट केली होती. हा उत्सव साजरा करण्यासाठी समाज बांधवांनी जय्यत तयारी केली होती. आता या उत्सवाला बुधवारपासून प्रारंभ झाला असून तीन दिवस हा उरुस चालणार आहे. उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल होती. नमाजपठण झाल्यानंतर सामूहिक कुराण पठणाचा कार्यक्रम झाला. तर गुऊवार दि. 2 फेब्रुवारी रोजी बाद नमाज-ए-जोहर जुलूस-ए-संदलचा कार्यक्रम होणार आहे. बागवान गल्ली येथून या संदलला प्रारंभ होणार असून दर्गा शरीफ करुन नमाज-ए-मगरीब, नजार-ए- मुकद्दशा येथे त्याची सांगता होणार आहे.
दरम्यान, शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:45 वाजता दर्ग्यावर चादर चढविण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानतंर सामूहिक नमाजपठण होवून लंगर आयोजित करण्यात आले आहे. गुऊवार व शुक्रवारी रात्री 9 वाजता कव्वाली कार्यक्रमही आयोजिण्यात आला आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.