वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीनने आपल्या विस्तारवादाला आणि आक्रमक प्रवृत्तीला आळा घालावा असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी दिला आहे. त्यांचे अधिकृत निवासस्थान असणाऱया व्हाईट हाऊसने एका निवेदनाद्वारे चीनच्या शांतता झुगारून देण्याच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. चीनच्या भूमिकेमुळे जगातील शांतता भंग पावत असून याचा परिणाम चीनलाही भोगावयास लागल्यावाचून राहणार नाही, असे प्रतिपादन व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी शुक्रवारी केले.
चीनने तैवानवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. तैवान हा आपलाच भाग असल्याचे चीनचे ठाम प्रतिपादन असते. त्यामुळे अमेरिकेच्या कनिष्ठ लोकप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानच्या दौऱयावर असताना चीनने केलेल्या विरोधामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावग्रस्त झाले आहे. चीनने आपल्या विस्तारवादाला आळा घातला नाही तर मोठी शोकांतिका घडू शकते असे अमेरिकेने स्पष्ट करतानाच परिणामांची तमा बाळगावी अशी सूचना केली.
पॅलोसी तैवानमध्येच असतानाच चीनने व्यापक युद्ध सरावाची घोषणा केली होती. दौरा संपल्यानंतर चीनच्या युद्धनौकांनी तैवानला चारही बाजूनी घेरून युद्धाभ्यास सुरू केला होता. तैवानच्या सागरी कार्यक्षेत्रात क्षेपणास्त्र हल्लेही करण्यात आले होते. अमेरिकेने मात्र संयमाने परिस्थिती हाताळली असून आतापर्यंत तोल ढळू दिलेला नाही. तथापि चीनचा उद्दामपणा त्याने आटोक्यात आणला नाही तर अमेरिकाही स्वस्त बसणार नाही. संघर्ष चिघळल्यास उत्तरदायित्व पूर्णपणे चीनचे असेल. तैवान हा अमेरिकेचा मित्र देश असल्याने त्याच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व अमेरिकेवर आहे. चीनने तैवान बळकाविण्याचा प्रयत्न केल्यास चीनशी युद्ध करण्यास अमेरिका मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने दिलेला होता. तरीही चीनने त्याकडे दुर्लक्ष केल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले असून जगासमोर आणखी एका सामरिक संघर्षाचा धोका उभा राहिला आहे असे मत अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.