झेलेंस्की यांच्या पत्नीसोबत शाळेला दिली भेट
वृत्तसंस्था / कीव्ह
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी (प्रथम महिला) जिल बिडेन रवारी अचानकपणे युद्धग्रस्त युक्रेनच्या दौऱयावर पोहोचल्या. यादरम्यान त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्या पत्नी ओलेना यांची भेट घेतली आहे. रशियासोबत युक्रेनचे युद्ध सुरू असताना अमेरिकेच्या अध्यक्षांच्या पत्नींचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. 24 फेब्रुवारी रोजी रशियाच्या आक्रमणापासून अमेरिकेसह नाटो देशांच्या अनेक नेत्यांनी युक्रेनचा दौरा केला आहे. परंतु जो बिडेन यांनी युक्रेनचा दौरा करणे अद्याप टाळले आहे.
जिल बिडेन यांच्या युक्रेन दौऱयाला अत्यंत गुप्त ठेवण्यात आले. हे युद्ध रोखायचे आहे, हे युद्ध विनाशकारी ठरले असून अमेरिकेचे नागरिक युक्रेनच्या नागरिकांसोबत उभे आहेत असे त्यांनी म्हटले आहे. ओलेना झेलेंस्की यांच्यासोबत युक्रेनचे सीमावर्ती शहर उज्होरोडचा दौरा त्यांनी केला आहे. हे शहर स्लोवाकियाच्या सीमेला लागून आहे.
जिल बिडेन आणि ओलेना झेलेंस्की यांनी एका शाळेलाही भेट दिली आहे. ओलेना यांनी या दौऱयाबद्दल जिल बिडेन यांचे आभार मानले आहेत. युद्धादरम्यान अमेरिकेच्या फर्स्ट लेडींना युक्रेनमध्ये का यावे लागले हे आम्ही समजतो. युक्रेनमध्ये दररोज सैन्य कारवाई होत असल्याचे ओलेना म्हणाल्या.