बघा काय म्हणतात तज्ञ ः अमेरिकेत 28 वर्षात सर्वात मोठी वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेतील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह यांनी व्याजदरात जवळपास 75 बेसिस पाँईटनी वाढ केली आहे. सदरची वाढ ही 1994 नंतर सर्वात मोठी केली आहे. यासोबतच आपल्या आगामी बैठकीत व्याजदर पुन्हा 50 बेसिस अंकांनी वाढ करण्याचे संकेतही मिळत आहेत.
अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि स्वित्झर्लंड यांनीही व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे आता आगामी काळात भारतीय रिझर्व्ह बँकेची काय भूमिका राहणार याकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. कारण की जगभरातील वातावरणामुळे आरबीआयवर दबाव वाढण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे. आरबीआयने एक महिन्या अगोदर दोन वेळा रेपो दरात जवळपास 90 बेसिस पाँईटने वाढ केली होती.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज प्रायमरी डिलरशिपच्या फिक्स्ड इनकम विभागाचे प्रमुख नवीन सिंह यांनी म्हटले आहे, की आरबीआयची पतधोरण बैठक ही येत्या ऑगस्टमध्ये होणार आहे. यातच व्याजदराबाबतची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. कारण अमेरिकन फेडरलने आता व्याजदरात वाढ केली आहे. यासोबतच अमेरिकन फेडरलची पुढील बैठक जुलैमध्ये होणार आहे. आरबीआयचा रेपोदर कमीत कमी त्याचपटीने वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज सिंह यांनी मांडला आहे.
व्याजदर वाढणार
आरबीआयने आठ जून रोजी रेपोदरात 0.50 बेसिस पाँईटची वाढ केली होती. यामुळे आगामी पतधोरण बैठक दोन ते चार ऑगस्टदरम्यान होणार असल्याची माहिती आहे. यामुळे महागाईचा वाढता दर लक्षात घेता व्याजदरात आरबीआय वाढ करणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.