जून-जुलैमध्ये अमेरिका दौरा शक्य : अमेरिकन संसदेतही देणार भाषण
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावषी जून किंवा जुलैमध्ये अमेरिकेला भेट देऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मोदींना अमेरिका दौऱयाचे निमंत्रण पाठवले आहे. भारतानेही हे निमंत्रण स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दोन्ही देशांचे अधिकारी दौऱयाची तारीख निश्चित करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी जी-20 बैठकीपूर्वी अमेरिकेला भेट देऊ शकतात. यंदा भारत जी-20 चे आयोजन करत आहे. ही शिखर परिषद सप्टेंबरमध्ये होणार आहे. या बैठकीला अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यासह जगभरातील बडे नेते सहभागी होणार आहेत. यानंतर मोदी देशांतर्गत कार्यक्रमांमध्ये व्यग्र असतील. जी-20 परिषदेनंतर वर्षअखेरीस होणाऱया विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंतणार असल्यामुळे अमेरिकेचा दौरा जून-जुलैमध्ये ठेवण्याचा विचार केला जात आहे.
जून आणि जुलैमध्ये अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज चालेल. त्यामुळेच या दौऱयात मोदी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार असल्याचे मानले जात आहे. याशिवाय ते व्हाईट हाऊसच्या स्टेट डिनरलाही उपस्थित राहू शकतात. सद्यस्थितीत या दोन महिन्यात मोदींचा कोणताही परदेश दौरा ठरलेला नाही किंवा भारतात कोणताही महत्त्वाचा कार्यक्रम ठरलेला नाही. त्यामुळे अमेरिकेच्या दौऱयाबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे या प्रकरणावर लक्ष ठेवणाऱया अधिकाऱयांचे म्हणणे आहे. सध्या या बैठकीचे नियोजन प्राथमिक टप्प्यात आहे.
बायडेन यांच्या कारकिर्दीतील मोदींचा दुसरा अमेरिका दौरा
बायडेन यांच्या कार्यकाळातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा अमेरिका दौरा असेल. याआधी ते सप्टेंबर 2021 मध्ये वॉशिंग्टनला गेले होते. यादरम्यान त्यांनी पहिली द्विपक्षीय शिखर परिषद घेतली आणि पहिल्या वैयक्तिक क्वाड समिटमध्ये भाग घेतला होता.