युक्रेनच्या मंत्र्याने केली होती मागणी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
रशियाविरोधात लढत असलेल्या युक्रेनला एफ-16 लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनची मागणी फेटाळली आहे. बिडेन यांच्यापूर्वी जर्मनीने देखील स्वतःची लढाऊ विमाने युक्रेनला पुरविण्यास नकार दिला होता. युक्रेनला अमेरिकेच्या या निर्णयामुळे मोठी निराशा होणार आहे.
मागील आठवडय़ात लेपर्ड रणगाडे मिळाल्यावर युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांनी लढाऊ विमानांची मागणी केली होती. अमेरिका तसेच पाश्चिमात्य देशांसोबत मिळून एक फायटर जेट आघाडी निर्माण करत युद्धाचा रोख बदलण्याचा विचार युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी मांडला होता.
एफ-16 फाल्कनला जगातील सर्वात विश्वासार्ह लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. अमेरिकेसह बेल्जियम तसेच पाकिस्तानकडून या लढाऊ विमानांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. युक्रेनला एफ-16 लढाऊ विमाने मिळाली असती तर युद्धात त्याला निश्चितच मोठा लाभ झाला असता. युक्रेन अद्याप सुमारे 30 वर्षे जुन्या सोव्हियत काळातील लढाऊ विमानांचा वापर करत आहे. ही लढाऊ विमाने युद्धात फारशी उपयुक्त ठरलेली नाहीत.
जर्मनीचा नकार
जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्ज यांनी रणगाडय़ांची मागणी पूर्ण होताच युक्रेनने त्वरित लढाऊ विमाने मागणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. रशियासोबत केवळ युक्रेन युद्ध लढत आहे, नाटो नव्हे. आम्ही शस्त्रास्त्रs पाठवून युद्धाची व्याप्ती आणखी वाढवू शकत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती. तर लढाऊ विमाने प्राप्त होतील असा विश्वास युक्रेनला वाटत होता. अण्वस्त्रs वगळून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून आम्ही कुठलीही शस्त्रास्त्रs प्राप्त करू शकतो असे उद्गार युक्रेनच्या संरक्षणमंत्र्यांनी मागील आठवडय़ात काढले होते.
रशियाकडून धमकी
युक्रेनला लेपर्ड अन् अब्राम रणगाडे पुरविण्याच्या घोषणेनंतर रशियाने अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांवर छुप्या युद्धाचा आरोप केला होता. युक्रेनला रणगाडे पुरवून युद्धाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न केला जात असून रशियाला हे कदापिही मान्य होणार नाही. युक्रेनला रणगाडे पुरविणाऱया देशांना याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी जर्मनीतील रशियाचे राजदूत सर्गेई नेशायेव्ह यांनी दिली होती.