नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इराणकडून गुप्तपणे कच्चे इंधन तेल खरेदी केल्याचा आरोप ठेवत अमेरिकेने एका भारतीय पेट्रोकेमिकल कंपनीविरोधात निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव ‘तिबालाजी’ असून ती मुंबईत नोंद झालेली आहे. आणखीही काही भारतीय कंपन्या याच कारणासाठी अमेरिकेच्या रडारवर आहेत.
तिबालाजी कंपनीने इराणकडून काही जहाजे भरुन कच्चे तेल खरेदी केले आणि ते चीनला विकले, असा अमेरिकेचा आरोप आहे. अमेरिकेची निर्बंध लादले गेलेली ही पहिलीच भारतीय कंपनी आहे. 2018 मध्ये अमेरिकेने रशिया व इराणविरोधात एकतर्फी निर्बंध लादण्याचा कायदा संमत केला होता. या दोन देशांशी आर्थिक व्यवहार करणाऱया देशांवर किंवा कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादण्याचा अधिकार या कायद्यामुळे अमेरिकेच्या प्रशासनाला मिळाला आहे. आतापर्यंत अमेरिकेने तो भारताच्या विरोधात उपयोगात आणला नव्हता. पण आता ही कारवाई झाली आहे.
या कायद्यामुळे भारतच्या सरकारला इराणकडून कच्च्या इंधन तेलाची खरेदी करणे थांबवावे लागले आहे. त्यापूर्वी भारत आपल्या आवश्यकतेच्या 11 टक्के इंधन तेल इराणकडून खरेदी करत होता. भारताने अधिकृतरित्या अमेरिकेच्या या कायद्याला मान्यता दिलेली नाही. मात्र, जगातील इतर देशांप्रमाणे भारतालाही अमेरिकेच्या या कायद्याचा सन्मान ठेवावा लागत आहे.
अनेक कंपन्यांवर निर्बंध
भारताच्या या एका कंपनीप्रमाणेच अमेरिकेने इराणमधील अनेक संस्था आणि कंपन्या, संयुक्त अरब अमिरातीतील अनेक कंपन्या तसेच हाँगकाँग आणि इतर काही देशांमधील कंपन्यांच्या जाळय़ांवर निर्बंध घातले आहेत. या सर्व कंपन्यांकडू इराणी तेलाची खरेदी करुन ते तेल इतर देशांना विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिबालाजी या कंपनीने इराणकडून कच्च्या तेलाप्रमाणेच लक्षावधी डॉलर्सचे मेंथॉल आणि बेस ऑईल विकत घेतले आणि लाभ कमावून चीनला विकले. ट्रायलान्स नामक मध्यस्थ कंपनीकडून हे तेल खरेदी करण्यात आले अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.