‘एलएसी’सह हिंदी महासागरात शत्रूच्या प्रत्येक हालचालींवर राहणार नजर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिकेकडून मिळणारे ‘एमक्यू 9बी प्रीडेटर आर्म्ड ड्रोन’ भारताला लवकरच मिळणार आहेत. या अत्याधुनिक ड्रोनच्या मदतीने नियंत्रण रेषा (एलओसी), वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) आणि हिंदी महासागराच्या बाजूने शत्रूवर लक्ष ठेवणे भारतासाठी सोपे होणार आहे. अमेरिकेकडून भारताला मिळणाऱया ‘एमक्यू 9बी प्रीडेटर आर्म्ड ड्रोन’मुळे या संवेदनशील भागात शत्रूला कोणत्याही प्रकारच्या कुरापती करणे अशक्मय होणार आहे. हे ड्रोन कोणत्याही विमानापेक्षा जास्त वेळ उडू शकते आणि जास्त वेळ हवेत राहू शकते, दिवसा किंवा रात्री दोन्ही वेळेस फुल मोशन व्हिडिओ देऊ शकते, याच्या मदतीने भारत आता शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवू शकतो.
भारताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण गरजांसाठी ‘एमक्यू 9बी प्रीडेटर आर्म्ड ड्रोन’ यंत्रणा अत्यंत महत्त्वाची मानले जाते. करार झाल्यानंतर तिन्ही दलांना प्रत्येकी 10-10 ड्रोन दिले जातील. 2017 मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात हा करार झाला होता. भारत आणि अमेरिका यांच्यातील या कराराची किंमत तीन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. या करारांतर्गत भारताला 30 ‘एमक्यू 9बी प्रीडेटर आर्म्ड ड्रोन’ मिळतील. यावर 5 वर्षांपासून काम केले जात होते, असे या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱयांनी सांगितले.
या ड्रोन यंत्रणेच्या मदतीने भारत केवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नव्हे तर हिंदी महासागरतील सुरक्षेच्या पातळीवरही पाळत ठेवण्याची यंत्रणा अधिक मजबूत करू शकेल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या कराराबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि त्यांचे अमेरिकन समकक्ष जेक सुलिव्हन यांच्यासह अनेक उच्चस्तरीय अधिकाऱयांशी चर्चा पूर्णत्वास नेली आहे.
‘एमक्यू 9बी प्रीडेटर आर्म्ड ड्रोन’ या श्रेणीतील इतर कोणत्याही विमानापेक्षा कितीतरी अधिक शक्तिशाली आहे. याशिवाय हे ड्रोन ऑनबोर्ड सिस्टिमसह इतर अनेक प्रकारची माहिती देते. ही एक बहुउद्देशीय ड्रोन यंत्रणा असून ती दूर बसूनही चालवता येते. जपान, बेल्जियम, ब्रिटनसह अनेक मोठे देश या ड्रोन प्रणालीचा वापर करत आहेत.