इराणमध्ये पोलिसांची कारवाई तीव्र ः शैक्षणिक संस्थांमध्ये घुसले जवान ः विद्यार्थ्यांवर गोळीबार
वृत्तसंस्था/ तेहरान
इराण सरकारच्या विरोधात होत असलेल्या निदर्शनांमध्ये शालेय विद्यार्थीही सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी निदर्शकांच्या विरोधातील स्वतःच्या कारवाईला वेग दिला आहे. सुरक्षा दलांनी शैक्षणिक संस्थांमध्ये कारवाई सुरू केली आहे. निदर्शकांवर गोळीबार करत अश्रूधूराचा मारा करण्यात येत आहे. या कारवाईत दोन निदर्शकांचा मृत्यू झाला आहे.
याचबरोबर कुर्दीस्तानची राजधानी सानंदजमध्ये पोलिसांनी एका कारचालकावर गोळय़ा झाडल्या आहेत. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या गोळीबारात एका निदर्शकाचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलांच्या कारवाईत सानंदज येथील दोन शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 154 जणांना जीव गमवावा लागल्याची माहिती इराण ह्युमन राइट्सने दिली आहे.
निदर्शनांदरम्यान इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रहीसी हे शनिवारी तेहरानमधील अल जाहरा विद्यापीठात पोहोचले. विद्यापीठांमध्ये स्वतःचा हेतू पूर्ण करता येईल असे शत्रूला वाटते, परंतु आमचे शिक्षक आणि विद्यार्थी जागरुक असून ते शत्रूचे स्वप्न कधीच पूर्ण करू देणार नाहीत असे उद्गार रहीसी यांनी काढले आहेत. तर राष्ट्रपतींच्या भाषणानंतर विद्यार्थिनींनी हुकुमशहाचा मृत्यू व्हावा अशा घोषणा दिल्या आहेत.
इराण सरकार निदर्शने दडपण्यासाठी कठोर कारवाई करत आहे. परंतु कुर्द प्रांतातून सुरू झालेली निदर्शने आता इराणच्या 9 प्रांतांपर्यंत पोहोचली आहेत. तेहरान, अल्बोर्ज, इस्फहान, फारस, करमान, खोरासन, गीलानमध्येही सरकारच्या महिलाविरोधी धोरणांच्या विरोधात लोक रस्त्यांवर उतरले आहेत.