प्रतिनिधी/ वास्को
वास्कोतील सप्ताह फेरीत प्लास्टीक वापरावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, शहरात सध्या प्लास्टीक कचऱयाचा खच पसरलेला दिसत आहे. त्यामुळे बंदी केवळ जाहीर करण्यासाठीच होती हे उघड झालेला आहे. दरवर्षी फेरी संपल्यानंतर शहरात प्लास्टीक कचरा सर्वत्र पसरलेला असतो.
वास्को शहरात रविवारी तेराव्या दिवशीही फेरी होती. जुझे वाझ रस्ता तसेच काही अंतर्गंत मार्गावर फेरीचा गोंधळ तेजीत होता. ज्या ठिकाणी फेरीवाल्यांनी रस्ता मोकळा केलेला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी प्लास्टीक कचऱयाचा खच दिसत असून काही ठिकाणचा प्लास्टीक कचरा पालिकेने उचलला आहे. अद्याप राहिलेली फेरी गेल्यावर मोठय़ा प्रमाणात प्लास्टीक कचरा उचलावा लागणार आहे. वास्कोत भरणाऱया फेरीच्या वेळी प्लास्टीक पिशव्या व इतर प्लास्टीकच्या वापरावर मुरगाव पालिकेकडून बंदी असते. दरवर्षी हे निर्बध असतात. परंतु या नियमाचे किंचितही पालन होत नाही. फेरी संपल्यानंतर दरवर्षी प्लास्टीक कचरा शहरात पसरलेला असतो. यंदाही अशीच परिस्थिती आहे. आतापर्यंत पालिकेने फेरीत प्लास्टीक वापर बंदी अशी केलेली घोषणा फसवीच निघालेली आहे. त्यामुळे प्लास्टीक वापरावर बंदी केवळ जाहीर करण्यासाठीच असते असेच दिसून आलेले आहे.