दहशतवादी संघटनामंध्ये 40 टक्के भरती अन् 55 टक्के फंडिंग ऑनलाईन ग्रूपद्वारे
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
सोशल मीडिया आता दहशतवादी संघटनांसाठी सर्वात मोठे शस्त्र ठरले आहे. ब्रुकिंग सेंटर फॉर मिडिल ईस्ट पॉलिसीनुसार ट्विटरवर इस्लामिक स्टेटची जवळपास 70 हजार सक्रीय अकौंट्स आहेत आणि सर्वांचे कमीतकमी प्रत्येकी एक हजार फॉलोअर्स आहेत. यानुसार सुमारे 7 कोटी लोक केवळ इस्लामिक स्टेटशी जोडले गेलेले आहेत.
ग्लोबल टेररिजम इंडेक्स 2022 नुसार जगभरात 2021 या वर्षादरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील 29 टक्के मृत्यूंसाठी इस्लामिक स्टेट जबाबदार आहे. इस्लामिक स्टेटमध्ये 40 टक्के विदेशी दहशतवादी सोशल मीडियाद्वारे दाखल झाले आहेत. 2018 मधील एका संशोधन अहवालानुसार फेसबुकवर इस्लामि स्टेटची 96 देशांमध्ये 1 हजार अकौंट्स आहेत.
तर तालिबान देखील मोबाइलद्वारे आयईडी हल्ल्याचे व्हिडिओ तयार करून ट्विटरवर अपलोड करत भरती आणि फंडिंगची कामे करत आहे. युटय़ूब, फेसबुक, व्हॉट्सऍप आणि टेलिग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवर दहशतवादी संघटना व्हिडिओ अपलोड करून मोठय़ा कंपन्यांच्या जाहिरातींद्वारेही दर महिन्याला कोटय़वधी रुपये कमावत आहेत.
90 टक्के दहशतवादी कारवाया आता सोशल मीडियाद्वारे केल्या जात आहेत. हायफा विद्यापीठातील गॅब्रियाल वीमनच्या अध्ययनानुसार इंटरनेटवर 90 टक्के दहशतवादी कारवाया सोशल मीडियाद्वारेच होतात. हिजबुल मुजाहिदीनने काही वर्षांपूर्वी काश्मीरमधील 50 तरुणांना सोशल मीडियाच्या मदतीने स्वतःमध्ये सामील करून घेतले होते.
फेब्रुवारी 2020 मध्ये ब्लॅकबर्ड या अमेरिकेतील कंपनीकडून करण्यात आलेल्या एका केस स्टडीमध्ये सोशल मीडियावर दहशतवादी कारवायांना बळ देणारे 9,27,908 ट्विट्स 47 वेगवेगळय़ा भाषांमध्ये फैलावले जात होते असे आढळून आले. जगातील एकूण 8 अब्ज लोकसंख्येपैकी सुमारे 4 अब्ज लोक सोशल मीडियावर सक्रीय आहेत. 30 टक्के युजर्स 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. याचमुळे दहशतवादी संघटना या तरुण-तरुणींना लक्ष्य करत आहेत.
मार्च 2019 मध्ये न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये फेसबुक लाइव्हस्ट्रीमिंग करत 51 जणांची हत्या करण्यात आली होती. तसेच अलिकडेच राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैयालाल यांच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून लोकांना भडकविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
सायबर जगतावर नजर ठेवण्यासाठी जगात कुठलेही एकच व्यासपीठ नाही. याचमुळे वेगवेगळय़ा देशांमध्ये कार्यरत छोटे-छोटे दहशतवादी गट सहजपणे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संपर्क साधू शकतात. दहशतवादाला वित्तपुरवठा करणारा हज्जाज फहद आजमीने ट्विटरच 17 लाख फॉलोअर्सना दहशतवादी कारवायांसाठी निधी देण्याचे आवाहन केले होते.