वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मलेशियातील जोहोर बेहरु येथे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया कनिष्ठांच्या पुरुषांच्या सुल्तान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी 18 जणांचा भारतीय कनिष्ठ हॉकी संघ हॉकी इंडियाने जाहीर केला असून आघाडी फळीत खेळणाऱया उत्तम सिंगकडे नेतृत्व सोपविले.
2019 साली झालेल्या या स्पर्धेत भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने रौप्य मिळविले होते. ब्रिटन आणि भारत यांच्यात अटीतटीचा सामना झाला होता. मलेशियात होणाऱया यंदाच्या स्पर्धेत विद्यमान विजेता ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण आफ्रिका, यजमान मलेशिया यांचा सहभाग राहील. कोरोना महामारी समस्येमुळे सदर स्पर्धा गेली दोन वर्षे खेळविण्यात आली नव्हती. 2021 साली भारतात झालेल्या कनिष्ठांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचे नेतृत्व उत्तम सिंगकडे होते. तसेच जकार्ता येथे 2022 आशिया चषक हॉकी स्पर्धेत उत्तम सिंगने भारताच्या वरिष्ठ संघामध्ये प्रवेश मिळविला होता.
मलेशियात होणाऱया या आगामी स्पर्धेसाठी भारतीय कनिष्ठ हॉकी संघाच्या उपकर्णधारपदी बॉबी सिंग धामीची नियुक्ती करण्यात आली आहे. गोलरक्षक एच. एस. मोहित आणि अंकित मलिक त्याचप्रमाणे अमीर अली, शारदानंद तिवारी, रोहित, अमनदीप लाक्रा, सिरील लुगुन, विष्णुकांत सिंग, राजिंदर सिंग, अंकित पाल, सी. बी. पुवण्णा, अमनदीप जॉन्सन पुर्ती, अंगडबीर सिंग, अरजित सिंग हुंडाल, सुदीप चिरमाको यांचा या संघात समावेश आहे. भारतीय हॉकी संघाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना यजमान मलेशियाबरोबर 23 ऑक्टोबरला होणार आहे. 23 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेचा एक सामना खेळविला जाईल. भारताचा जपानविरुद्ध सामना 25 ऑक्टोबरला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 26 ऑक्टोबर तर ब्रिटन विरुद्ध सामना 28 ऑक्टोबरला होणार आहे. ही स्पर्धा राऊंड रॉबिन लीग पद्धतीने खेळविली जाणार असून आघाडीचे दोन संघ 29 ऑक्टोबर रोजी होणाऱया अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील.