ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) यमुना एक्स्प्रेसवेवर बोलेरो आणि डंपरचा भीषण अपघात (Accident on Yamuna Expressway) होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या या अपघातात मृत पावलेले सर्वजण पुण्याचे (Pune) रहिवासी आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वाहनाने ट्रकला धडक दिली. हा अपघात यमुना एक्सप्रेस-वे वर गुरुवारी पहाटे ५ वाजता जेवार टोल प्लाझाजवळ झाला.
बोलेरोमध्ये एकूण ७ जण प्रवास करत होते. यातील चंद्रकांत नारायण बुराडे (६८), स्वर्णा चंद्रकांत बुराडे (५९), मालन विश्वनाथ कुंभार (६८), रंजना भरत पवार (६०) आणि नुवंजन मुजावर (५३, कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत. तर नारायण रामचंद्र कोलेकर व सुनिता राजू गस्ते या दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जेवर येथील कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, यमुना एक्स्प्रेस वेवर गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे ५ वाजता जेवार टोल प्लाझाजवळ झाला. अपघातानंतर सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या दोघांवर कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रवासी बोलेरो ज्या डंपरला धडकली तो डंपर पोलिसांनी जप्त केला आहे.