वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरू झालेल्या 2023 च्या सहाव्या युवा महिलांच्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेतील पहिल्या दिवशी उत्तराखंडची महिला मुष्टीयोद्धी निकिता चंदने पहिल्या फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या वैष्णवी वाघमारेचा पराभव करत विजयी सलामी दिली.
यापूर्वी दोनवेळा आशियाई कनिष्ठ चॅम्पियन ठरणारी निकिता चंदने 60 किलो वजन गटातील पहिल्या फेरीच्या सामन्यात वैष्णवी वाघमारेचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला. आता निकिताची पुढील फेरीतील लढत उत्तर प्रदेशच्या अनामिकाशी होणार आहे.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अन्य लढतीमध्ये हरियाणाच्या भावना शर्माने 48 किलो गटात, उत्तर प्रदेशच्या शालिनी गुप्ताने 52 किलो गटात, चंदिगडच्या निधीने 52 किलो गटात, पंजाबच्या रिया तूरने 60 किलो गटात, दिल्लीच्या सुप्रिया रावतने 66 किलो गटातील लढतीत प्रतिस्पर्ध्यांवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत पुढील फेरीत स्थान मिळवले. 50 किलो गटात महाराष्ट्राच्या खुशी जाधवने ओडिशाच्या मेघा बेहराचा पराभव केला.