कोरोना तज्ञ समितीच्या बैठकीत शिफारस : मास्क, सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
कोरोना व्यवस्थापनाच्या तज्ञ समितीने खासगी हॉस्पिटलमधून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्याची शिफारस केली असून बालरोगतज्ञ डॉक्टर्सना तशी मुभा द्यावी, असे नमूद केले आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण वाढत असले तरी सध्या निर्बंध लादण्याची गरज नाही, तरीही लोकांनी स्वतःची काळजी घेत मास्क, सामाजिक अंतर तसेच अन्य नियमांचे पालन अवश्य करावे, असे आवाहन कोरोनाविषयक तज्ञ समितीने केले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी तज्ञ समितीची बैठक झाली. त्यात कोरोना परिस्थितीचा आढवा घेण्यात आला. लोकांनी चिंता करण्याची किंवा घाबरण्याची गरज नाही. आपली काळजी आपणच घेणे आवश्यक आहे. लोकांनी मास्क लावणे तसेच सामाजिक अंतर पाळणे व इतर कोराना नियम व अटींचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
कोरोनाचे रुग्ण किंचित वाढले म्हणून प्रत्येकवेळी निर्बंध लादणे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचा बचाव करावा. वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्यांनी बुस्टर डोस घेऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवावी. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून ते आता खासगी दवाखान्यात उपलब्ध करण्याचा सरकारचा इरादा असल्याचे राणे यांनी नमूद केले.
शाळांमध्ये लसीकरण सुरू करणार!
आता शाळा सुरू झाल्या असून तेथे आरोग्य खात्यातर्फे लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. 12 ते 14 वर्षे आणि 15 ते 17 वर्षे या वयोगटाच्या लसीकरणासाठी भर देण्यात येणार आहे. सर्व लोकांनी मास्क वापरावे. कोरोनाच्या संसर्गात चढ-उतार होत असून शेजारील राज्यात तसा चढ उतार चालू आहे. पर्यटकांनी याबाबत चिंता करू नये. त्यांच्यासाठी सध्यातरी कोणतेच निर्बंध नाहीत, असे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.
बुधवारी 77 नवे बाधित : विलगीकरणात 76 जण तर 1 हॉस्पिटलात दाखल
कोरोनाचे राज्यातील रूग्ण दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासांत म्हणजे काल बुधवारी 77 नवे बाधित सापडले आहेत. त्यातील एकाला इस्पितळात दाखल करण्यात आले असून उर्वरीत 76 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 376 वर पोहोचली असून बळी नसल्याने ती संख्या स्थीर म्हणजे 3832 एवढीच आहे.
काल दिवसभरात एकूण 960 जणांचे नमुने तपासण्यात आले असून त्यात 77 जण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे, तर 29 जण बरे झाल्याची नोंद आरोग्य खात्याने केली आहे. आतापर्यंत एकूण 246192 जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यातील सुमारे 241984 जणांना कोरोनातून बरे झाले आहेत.
गोव्याची 2020 पासूनची कोरोनास्थिती
- कोरोनाबाधित 246192
- कोरोनातून बरे झाले 241984
- कोरोनामुळे मृत्यू 3832