प्रयाग चिखली वार्ताहर
जिल्हा परिषदेच्या वडणगे मतदार संघांतर्गत येणाऱ्या वडणगे, आंबेवाडी, प्रयाग चिखली, वरणगे आणि पाडळी या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज लागला असून पाच ग्रामपंचायती पैकी वडणगे, आंबेवाडी तसेच वरणगे या तीन ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासह निर्विवाद सत्तांतर झाले. पाडळी बुद्रुक येथे सत्तारूढ आणि विरोधक एकत्र येऊन केलेल्या शिवशाही पॅनेलची सत्ता आली तर प्रयाग चिखली येथे सत्तारूढ चव्हाटा पॅनलला नऊ जागा तर विरोधी बांसंगमेश्वर पॅनेलला सहा जागा आणि सरपंच पद मिळाले. सर्वच गावात स्थानिक आघाड्यांच्या मध्ये अत्यंत अटीतटीच्या लढती आणि चुरशीने मतदान झालेल्या या पाच ग्रामपंचायतीच्या निकालाकडे परिसराचे लक्ष लागले होते.
वडणगेत मास्तर पॅनेल ची “बाजी”
वडणगे येथे झालेल्या प्रमुख दोन पॅनेल मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत येथील मास्तर गटाला सतरा जागा पैकी सरपंच पदासह 14 जागा मिळाल्याने या गटाचे ग्रामपंचायतीवर निर्विवाद बहुमत सिद्ध झाले तर सत्तारुढ पाटील गटाला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. संपूर्ण तालुक्यात चर्चेत असलेल्या ग्रामपंचायतीवर निर्विवाद बहुमत प्राप्त करून पॅनलचे नेते बाजीराव पाटील यांनी “बाजी” मारल्याची चर्चा परिसरात चालू आहे
लोकनियुक्त सरपंच म्हणून पॅनेल प्रमुख सदाशिव मास्तर यांच्या सून सौ संगीता शहाजी पाटील या विजयी झाल्या आहेत त्यानी विरोधी पॅनल प्रमुख बी एच पाटील यांच्या सून वृषाली रवींद्र पाटील यांच्यासह दोन अपक्ष उमेदवारांचा पराभव केला
प्रयाग चिखलीत एकीकडे सरपंचपद तर सत्ता दुसऱ्याला
प्रयाग चिखली येथे गोकुळचे संचालक एस आर पाटील यांच्या चव्हाटा पॅनेल पर्यायाने सत्तारुढांना नऊ जागांसह बहुमत तर विरोधी रघुनाथ पाटील पांडबा यादव आणि संभाजीराव पाटील (भाजपा) यांच्या बाण संगमेश्वर पॅनेलला सरपंच पद आणि सहा जागा मिळाल्या. पॅनल प्रमुख रघुनाथ पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे 231 मतांनी विजयी झाले आहेत तर प्रतिस्पर्धी उमेदवार सत्तारुढ पॅनेल प्रमुख एस आर पाटील यांचे ज्येष्ठ बंधू हंबीरराव पाटील हे पराभूत झाले आहेत. या ठिकाणी रघुनाथ पाटील गटाने सरपंच पद मिळाल्यामुळे तर एस आर पाटील गटाने बहुमत मिळाल्याने जल्लोष केला.
गोकुळ विरुद्ध गोकुळ
लोकनियुक्त सरपंचपदी निवड झालेले रोहित पाटील हे गोकुळचे कर्मचारी आहेत तर विरोधी उमेदवार हंबीरराव पाटील यांचे बंधू तसेच पॅनेल प्रमुख एस आर पाटील हे गोकुळचे संचालक आहेत त्यामुळे या लढतीकडे गोकुळ परिवाराचे लक्ष लागून होते.
वरणगेत सत्तांतर: युवराज शिंदे सरपंचपदी विजयी
वरणगे येथे अनेक स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन सत्ता रोडांच्या विरोधात बांधलेल्या भैरवनाथ विकास आघाडीने सरपंच पदासह 14 जागा जिंकत एकतर्फी सत्ता हस्तगत केली तर करवीर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकराव पाटील तसेच मार्केट कमिटीचे माजी संचालक पै. मारुती ढेरे यांच्या सत्तारूढ भैरवनाथ पॅनलला एक ही जागा मिळाली नाही. अमित शंकरराव पाटील यांनाही पराभव पत्करावा लागला.
गावचे नूतन लोकनियुक्त सरपंच पदी युवराज शिंदे हे विजयी झाले त्यांनी विरोधी उमेदवार सोपान कनोजे सह अपक्ष उमेदवार इंद्रजीत कुंडले यांचा पराभव केला
विजयी आघाडी पॅनलचे नेतृत्व कुंभीचे माजी संचालक बळवंत पाटील शिवसेनेचे तानाजी आंग्रे माजी सरपंच- नामदेव पाटील विलास पाटील रामकृष्ण पाटील धनाजी पाटील रंगराव पाटील ज्ञानदेव पाटील व सहकाऱ्यांनी केले.
पाडळी बुद्रुक संयुक्त शिव शाहू पॅनेलचा विजय
पाडळी बुद्रुक गावातील पी डी पाटील गट आणि गायकवाड गट हे दोन पारंपारिक विरोधी गट ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आणि बिनविरोधाच्या तडजोडी केल्या मात्र या तडजोडी मान्य नसलेल्या एका परिवर्तन गटाने परिवर्तन पॅनल ची घोषणा केली या पॅनेलचे नेतृत्व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश राऊत अशोक पाटील संजय पाटील व सहकाऱ्यांनी केले दुसरीकडे एकत्र आलेल्या दोन पारंपारिक गटाच्या वतीने शिवशाहू आघाडी नावाने पॅनेल उभा केले. निवडणुकीत शिवशाही पॅनलचे सरपंच पदासह नऊ सदस्य निवडून आले तर विरोधी परिवर्तन पॅनेलला एका जागेवर समाधान मानावे लागले. सरपंच पदी शिव शाहू पॅनेलचे उमेदवार शिवाजी दत्तात्रय गायकवाड हे 482 मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीने गावातील राजकीय समीकरणे बदलली असल्याचे स्पष्ट झाले
आंबेवाडीत निर्विवाद सत्तांतर : सुनंदा मारुती पाटील सरपंचपदी
आंबेवाडी येथील सत्तारूढ पंचगंगा आघाडी चा दारुण पराभव करत येथील माजी सरपंच एम जी पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने सरपंच पदासह नऊ जागा जिंकत निर्विवाद बहुमत प्राप्त केले.
विरोधी पंचगंगा पॅनलचे विक्रम राजेंद्र अतितकर हे एकमेव सदस्य विजयी झाले लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार सुषमा रघुनाथ जाधव यांचा पराभव झाला