रुग्णालयाचे लोकार्पण होवून सहा महिने लोटले तरी अद्याप पुरेशा सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत वडगाव जिल्हा आरोग्य खात्याच्या कार्यालय आवारात 10 खाटांचे प्रसूतिगृह उभारण्यात आले आहे. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याने प्रसूतिगृह सज्ज झाले आहे. रुग्णालयाचे लोकार्पण होवून सहा महिने लोटले तरी अद्याप याठिकाणी आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि आवश्यक साहित्याची जुळणी करण्यात आली नाही. त्यामुळे प्रसूतिगृहाला आरोग्य अधिकाऱयाची प्रतीक्षा आहे.
स्मार्टसिटी योजनेअंतर्गत शहरवासीयांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव असून याअंतर्गत स्मार्ट प्रसूतिगृह उभारण्याची तरतूद केली होती. वडगाव येथे 10 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेत निधीची तरतूद करण्यात आली असून इमारत बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.
दक्षिण भागात विविध ठिकाणी महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंदे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये दोन ठिकाणी प्रसूतिगृहाचा समावेश आहे. पण वैद्यकीय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली नसल्याने महापालिकेची प्राथमिक आरोग्य केंदे बंद करण्यात आली आहेत.
होसूर, शहापूर आणि अनगोळ येथे प्रसूतिगृह होते. या ठिकाणी महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मात्र महापालिकेने सदर आरोग्य केंदे बंद केली असून, जिल्हा आरोग्य खात्याच्यावतीने प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी प्रसूतीसाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयावरच नागरिकांना अवलंबून रहावे लागते. गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे महागडे ठरत आहे. सध्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत
वडगाव येथे प्रसूतिगृह उभारण्यात आले आहे.