प्रतिनिधी /शिरोडा
शिरोडा येथील कला सागर सांस्कृतिक केंद्रातर्फे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित केलेल्या अखिल गोवा पातळीवरील अभंग गायन स्पर्धेत वरिष्ठ गटात वैष्णवी शैलेश शिरोडकर तर कनिष्ठ गटात गार्गी सिद्धये यांना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. श्री शिवनाथ देवस्थानच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात आली.
वरिष्ठ गटात अमोघ शशिकांत फडते याला द्वितीय तर शशिकांत नार्वेकर याला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. प्राजक्ता च्यारी, जान्हवी सामंत, लक्ष्मण नाईक, सुनील नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. कनिष्ठ गटात द्वितीय श्रेयश राजेश नाईक तर तृतीय मयांक राजेश नाईक याला मिळाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून जगदीश फडके, संतोष मामलेकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच संदेश प्रभूदेसाई यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संतोष नाईक, शशिकांत फडके, गुरुदास नाईक, ऋषिकेश नाईक व परीक्षक उपस्थित होते. बक्षीस वितरण माजी पंचसदस्य शिवानंद नाईक, हेमंत सामंत, गोकुळदास नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. संतोष नाईक यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धांत नाईक यांनी तर शशिकांत फडके यांनी आभार मानले.