पोटावरील विकारांवर आपण प्रभावी आसनांचा विचार करत असताना काल वज्रासन व मंडुकासन या दोन प्रकारांचा अभ्यास केला. आज आपण यावर आणखी दोन वक्रासन व पवनमुक्तासन या आसनांचा अभ्यास करणार आहोत. जी करण्यास सोपी आणि अत्यंत प्रभावशाली आहेत.
वक्रासनः पोटावरील विकारांवरील मालिकेत हे एक अत्यंत प्रभावशाली आसन आहे. या आसनामुळे पोटाला पिळ पडतो व एक प्रकारचा दाब आतडय़ांवर व पोटातील अवयवांवर पडतो व त्यांची कार्यक्षमता सुधारते यकृत, आमाशय, लहान व माठे आतडे यावर या आसनाचा प्रभावी परिणाम होऊन या संबंधीत आजार दूर करायला मदत होते. मधुमेह व मुतखडय़ाच्या आजारांमध्ये हे आसन जास्तीत जास्त वेळा करून आवश्यक फ्ढायदा घ्यावा.
कृती ः पाय सरळ सोडून दंडासनात बसावे व नंतर उजवा पाय गुडग्यात दुमडून त्या पायाची खोट नितंबाला टेकवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर डावा हात वर उचलून त्या हाताच्या कोपराने उजव्या पायाच्या ढोपराच्यावर दाब देवून डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाच्या अंगठय़ाला पकडण्याचा प्रयत्न करावा. उजवा हात कंबरेच्या मागे टेकवावा व डोके उजव्या बाजूला मागे वळवावे व नजरेने मागच्या दिशेने उजव्या खांद्यावरून पहावे.
या अंतिम स्थितीत सुरूवातीला श्वास रोखून जमेल तेवढा वेळ ठेवावा व नंतर श्वास सोडत पुन्हा पूर्व स्थितीत यावे. हे आसन विशेष आजारामध्ये आराम मिळावा म्हणून 10 ते 15 वेळा करावे. नंतर थोडीफ्ढार लवचिकता व सवय झाल्यावर अंतिम स्थितीत नैसर्गिकरित्या श्वासोश्वास घेऊन त्या अवस्थेत 5 ते 10 मिनिटे स्थीर रहावे.
पुन्हा अशीच कृती डाव्या पायाने सुध्दा करावी. दोन्ही बाजूने अशी कृती केल्यावर आसन पूर्ण होते.
महत्त्वाचे ः अ) कुठल्याही प्रकारची पोटाची शस्त्रक्रिया झाल्यास हे आसन किमान सहा महिने ते वर्षभर करू नये.
ब) गरोदर स्त्रियांनी योगाचार्य किंवा वैद्याच्या सल्ल्यानुसार करावे.
क) जेवणानंतर 3 ते 5 तासानंतर हे आसन करावे.
पवनमुक्तासनः पोटाच्या विकरांवरील मालिकेतील हे एक अत्यंत महत्त्वाचे आसन आहे. या आसनाचा लाभ प्रामुख्याने वारंवार पोटातगॅस होणाऱया रुग्णांना अगदी हमखास व त्वरित होतो. या आसनामुळे अपचन, ऍसिडीटी, पित्तप्रकोप व लठ्ठपणा कमी करण्यासाठी तसेच पोटाची घेरी कमी करण्यासाठी अगदी खात्रीशीर उपाय होतो.
कृती ः प्रथम प्रकार ः या प्रकारामध्ये आपण आळीपाळीने डावा व उजव्या पायाने पोटावर दाब देऊन पोटातील गॅस मोकळा करण्याचा प्रयत्न करावा
सर्वात प्रथम पाठिवर झोपावे व नंतर श्वास आत घेत उजवा पाय गुडग्यात दुमडून घ्यावा व नंतर दोन्ही हातांची घडी करून गुडग्यावर दाब द्यावा व नंतर याचा पोटावर दाब पडतो तिथे लक्ष द्यावे व पोट एकदम सैल सोडावे. या स्थितीत श्वास रोखून ठेवावा. श्वास रोखून पोटावर दाब दिल्याने व पोटाचे स्नायू शिथिल केल्याने आतडय़ावर दाब पडतो व पोटातील वायू असल्यास मोकळा होवून त्वरित हलके वाटते व आराम मिळतो अशीच कृती डाव्या पायाने सुध्दा करावी.
दुसरा प्रकार ः दोन्ही पाय गुडग्यात दुमडावेत व नंतर हातांची घडी घालून गुडग्यांवर दाब द्यावा. यामध्ये दोन्ही पायांनी पोटावर दाब दिल्याने व श्वास रोखून ठेवल्याने पोटातील गॅस मोकळा व्हायला मदत होते आणि अपचनापासून त्वरित मुक्ती मिळते.
महत्तवाचे ः अ) हे आसन करताना श्वास आत घेऊन पायांनी पोटावर दाब द्यावा यामुळे श्वास गुद्दद्वाराद्वारे बाहेर यायला मदत होते.
ब) अंतिम स्थितीत पोटावर लक्ष पेंदीत करून ते शिथिल करण्याची सवय करावी. ज्यामुळे वायू त्वरित बाहेर येतो व आराम मिळतो.