प्रितम निकम / शिराळा
शिराळा व वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित वाकुर्डे योजनेची स्वप्नपूर्ती झाल्याचे पहावयास मिळत आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याच्या बंदीस्त पाईप लाईन टेस्टींग करण्यास सुरुवात झाली आहे. अखेर शिराळा उत्तर भागातील शिवारात पाणी पडले.
जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या विषेश प्रयत्नामुळे तसेच आमदार मानसिंगराव नाईक व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी सातत्याने केलेल्या कष्टाचे फलित यामुळेच ही योजना पुर्णत्वास आली असल्याने शेतकरी वर्गातून त्यांचे आभार मानले जात आहेत.
गेल्या पंचवीस वर्षांपासून वाकुर्डे योजनेच्या नावाखाली राजकारण तापत आले आहे. वर्षानुवर्षांपासून सर्व निवडणुका हा योजनेला केंद्रबिंदू मानून पार पडल्या आहेत. या योजनेच्या पुर्णत्वासाठी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख तसेच दिवंगत नेते फतेसिंगराव नाईक आणि दिवंगत विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी विषेश प्रयत्न केले आहेत.
वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी करमजाई धरणातून पुढे औंढी पर्यंत आल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंदोत्सव साजरा करण्यात येऊ लागला आहे.