नवी दिल्ली : वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या लोहमार्गावर सातत्याने पाळिव जनावरे किंवा गुरे येऊन अपघात घडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गांधीनगर- मुंबई एक्सप्रेस लोहमार्गावर लवकरच 1000 किमीच्या सुरक्षा भिंती बांधण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि, “आम्ही सुरभा भिंती बांधण्याच्या मुद्द्यावर गांभीर्याने काम करत आहोत. त्यासाठी दोन वेगवेगळ्या डिझाईन्स निवडल्या आहेत. पुढील पाच ते सहा महिन्यांत हे डिझाइन उपयुक्त आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी काम करत असून विभागांमध्ये अशा 1,000 किमी भिंती बांधण्याची योजना आखत आहोत.” या भिंतीमुळे गुरेढोरे लोहमार्गावर येण्याची समस्या सोडवता येईल असेही वैष्णव म्हणाले.
रेल्वे मंत्रालयाच्या जाहीर केलेल्या आकडेवारीवरून गुरे आणि इतर घटनांमुळे रेल्वेचे नुकसान मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढले आहे. 2022 या आर्थिक वर्षात 2,115 ट्रेन नुकसानीची प्रकरणे समोर आली आहेत. तर गेल्या एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या फक्त सहा महिन्यांत 2,650 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

