५ शिक्षकांची कमी; ३१८ विद्यार्थ्यांसाठी फक्त ११ शिक्षक कार्यरत
कसबा बीड / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील कोगे या गावामध्ये जिल्हा परिषदची कन्या व कुमार विद्यामंदिर नवीन इमारत बांधण्यात आली. लोकसहभागातून अत्यंत सुंदर आणि सुसज्ज शाळेला एका स्वयंसेवी संस्थेकडून १ कोटी ६५ लाखांची शाळेला मदत झाली. तर एकूण २ कोटी १५ लाख खर्च करून बांधकाम पूर्ण झाले. सर्व प्रकारच्या सुसज्ज अशा सुसज्ज इमारतीमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढून शिक्षकांची संख्या कमी झाली आहे. एकाच ईमारतीमध्ये असलेल्या कन्या विद्या मंदिर आणि कुमार विद्यामंदिर, कोगे या शाळेचा पट अनुक्रमे १८३ आणि २१५ इतका आहे. एकूण 398 मुलांसाठी ११ शिक्षक आहेत. नियमानुसार १६ शिक्षकांची गरज असताना फक्त ११ शिक्षक संपूर्ण शाळेचा कार्यभार सांभाळत आहेत. ५ शिक्षकाची कमतरता असल्याने याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना पालकांमधून होत आहे.
अधिक वाचा- तुळशी खोऱ्यात मुसळधार पाऊस; खामकरवाडी प्रकल्प ओसंडू लागला
२००८ पासून शिक्षक भरती नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये जवळपास ४०० शिक्षकांची कमतरता असल्याचे बोलले जात आहे. कोगे गावातील शाळेमध्ये एक शिक्षक निवृत्त झाले आहेत. तर एका महिला शिक्षकाची बदली झाली आहे. कन्या व कुमार या शाळेसाठी २ मुख्याध्यापक, 3 अध्यापक व १ पदवीधर अद्यापक एवढ्या शिक्षकांची गरज आहे. नागदेववाडी केंद्रात झालेल्या मीटिंग मध्ये एकूण चार वेळा या शाळेमध्ये शिक्षक हवे असल्याचे मागणी केलेली आहे. तसा लेखी रिपोर्ट जिल्हा परिषदेकडे दिला आहे. पाठपुरावा करूनसुद्धा शाळेमध्ये शिक्षकांची नेमणूक होत नाही याबद्दल पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.