दोडामार्ग / वार्ताहर–
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दोडामार्ग तालुका मुख्यालय कार्यालय व अन्य अनेक ठिकाणी स्वराज्य महोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमांत उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार अरुण खानोलकर यांनी केले.
13 ते 15 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा उभारण्यात यावा याचे नियोजन करण्यात आले. 9 ऑग. रोजी सामूहिक राष्ट्रगीत तालुका मुख्यालय येथे होणार असून याठिकाणी सर्व तालुक्यातील खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी ठीक 11 वाजता उपस्थित राहावे व इतर नागरिकांनी जिथे असतील तिथे स्तब्ध राहून राष्ट्रगीत म्हणावे तसेच सर्व शाळेत ही म्हणावे असेही श्री. खानोलकर यांनी सूचित केले आहे. 10 ऑग. रोजी दोडामार्ग नगरपंचायत तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे, 12 ऑग. रोजी आरोग्य विभागाच्यावतीने तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये आरोग्य शिबीरे होणार आहे, तर 13 रोजी कृषी विभागातर्फे शेतकरी मेळावा मार्गदर्शन, 14 रोजी वृक्षरोपण, 15 ऑग. रोजी सकाळी 7 वाजता विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, व 17 ऑग. रोजी प्रभात फेरी व समारोप कार्यक्रम असणार आहेत. तरी हे कार्यक्रम, विविध उपक्रम सर्वांनी राबवावे असे तहसीलदार खानोलकर यांनी आवाहन केले आहे.