परूळे/ प्रतिनिधी-
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ, माय वे जर्नी ऑर्गनिझेशन आणि परुळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वाघांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि त्यांचं संवर्धन करण्यासाठी “सड्यावरील शाळा” या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे गावात जि. प. केंद्र शाळा परुळे येथे व्याघ्रदिनाबद्ल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परुळे शाळेतील जवळपास 50 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग दर्शवला. त्याचप्रमाणे परुळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, परुळे ग्रामस्थ आणि संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ, येथील द्वितीय वर्ष प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी, नेचर क्लब च्या स्वयंसेवकांनी चेहर्यावर वाघाची प्रतिकृती काढून शाळेतील मुलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. योगेश कोळी यांनी मुलांना व्याघ्र दिनाचे महत्व समजावून सांगितले व्याघ्र दिनाबद्दल बोलताना ते म्हणाले की “जर अश्याच प्रकारे जंगल नष्ट होत राहिले तर नक्कीच येत्या काही वर्षात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचेल आणि चित्ता हा प्राणी जसा भारतातून नामशेष झाला आहे, तसाच वाघ सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचेल” अशी चिंता डॉ. कोळी यांनी व्यक्त केली. एस. आर. एम. कॉलेजचे प्राणीशास्त्र विभागाचे विद्यार्थी तेजस सावंत आणि मयुरी चव्हाण यांनी वाघांचे मानवाच्या जीवनातील महत्व या विषयावर शाळेतील मुलांसमोर सादरीकरण केले. वाघ म्हणजे काय , जागतिक व्याघ्र दिवस का साजरा केला जातो, सध्या देशातील वाघांची परिस्थिती काय आहे, अन्नसाखळीतील वाघांचे महत्व, व्याघ्र प्रकल्प, कायदे आणि शिक्षा अश्या विविध विषयावर मुलांना माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे मुलांमध्ये वन्यप्राण्यांबद्दल प्रेम निर्माण व्हावे आणि वाघांचे जंगलातील वास्तव्य कस असत हे समजावे यासाठी त्यांना वाघ आणि जंगल यावर आधारित एक माहितीपट दाखवण्यात आला. मुलांमधील सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी आणि पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण करण्याहेतूने राष्ट्रीय प्राणी वाघ या विषयावर आधारित पोस्टर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत परुळे शाळेतील जवळपास २५ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. त्याचबरोबर लहान मुलांच्या चेहऱ्यावर वाघाची प्रतिकृती काढून वाघ वाचवा हा संदेश समाजापर्यंत पोहचवण्यात आला. पोस्टर स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांच्या चित्रांची निवड करून विजेत्या मुलांना संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील, इतिहास विभागाचे विभागप्रमुख डॉ. व्ही. जी. भास्कर यांनी दिलेल्या शाळेपयोगी वस्तू बक्षीस म्हणून देऊन पोस्टर विजेत्या मुलांचा गौरवण्यात करण्यात आला. सदर कार्यक्रमास संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळचे विद्यार्थी, तसेच प्राणीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. योगेश कोळी, माय वे जर्नी ऑर्गनायझेशन चे संस्थापक सदस्य, परुळे केंद्र शाळा ३ चे मुख्याध्यापक चव्हाण , प्राथमिक शाळांचे शिक्षक गोसावी , रसिका घोलेकर , गुडुलकर , परुळे ग्रामपंचायत सदस्य सुनिल चव्हाण, ग्रामसेवक शरद शिंदे, सुधीर पेडणेकर, महिला बचत गट सदस्य, सामाजिक संस्था कार्यकर्ते , परुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. “वाघ वाचवा” अशी गर्जना करून शाळेचा संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि ह्या कार्यक्रमाची सांगता झाली.