कार्तिकी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
प्रतिनिधी / बेळगाव
शहर परिसर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी कार्तिकी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी होणार आहे. शहरातील विठ्ठल मंदिरांतून टाळ-मृदंगांचा गजर पाहायला मिळणार आहे.
एकादशीनिमित्त पहाटे काकडारती, अभिषेक, पूजा, भजन, आरती तर रात्री जागर भजन व कीर्तन कार्यक्रम होणार आहेत. परंपरा जपत काही ठिकाणी दिंडीचेही आयोजन केले जाणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षात वारकऱयांना वारीला मुकावे लागले होते. मात्र, यंदा महाराष्ट्र शासनाने परवानगी दिल्याने वारकरी विठुरायांच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले
आहेत.
दर्शनासाठी भाविकांची वर्दळ
शहर परिसरातील विठ्ठल मंदिरांतून शुक्रवारी एकादशीनिमित्त सकाळपासून दर्शनासाठी वर्दळ वाढणार आहे. कोरोना काळात मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटानंतर सण-उत्सव उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे एकादशीसाठी विठ्ठल मंदिरे भक्तांनी फुलणार आहेत.
उपवासाच्या पदार्थांना बाजारात मागणी
शुक्रवारी कार्तिकी एकादशी असल्याने बाजारात गुरुवारी उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली होती. विशेषतः वरी तांदूळ (भगर), साबुदाणा, केळी, शेंगदाणा, खजूर, राजगिरा लाडू यासह फळांनाही मागणी वाढली होती. कोरोना काळात प्रतिकात्मक रुपात एकादशी साजरी झाली होती. मात्र, यंदा मंदिरे खुली करण्यात आल्याने भक्तांचा उत्साह वाढला आहे.