बाजारात 40 प्रकारचे खजूर उपलब्ध; व्हरायटीनूसार 100 ते 1600 रूपये किलो; दरामध्ये 10 टक्क्यांनी वाढ; सौदी अरेबीया, इराक, इराणमधून मोठी आवक
कोल्हापूर प्रतिनिधी
रमाजान उपवासासाठी सेवनामध्ये मोठ्याप्रमाणत वापर केल्या जाणाऱ्या पौष्टिक खजूरांचे 40 प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. रमजान महिन्याच्या पार्श्वभुमीवर सौदी-अरेबीया, इराक, इराण, जॉल्डेन, अल्जेरिया, टोनोशिया आदी आखाती देशातून खजूरांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यांच्या दरामध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बाजारात दाखल झालेल्या खजूरांमध्ये सौदी-दुबई वर्नीखजूर, मिनी अंबर, अंबर जंबो, जायदी खजूर, सौदी हलवा जंबो साईज, सौदी-अरेबीयाच्या कलमी, अजवा, मब्रूम, सुखरी, मेडजूल, इराणच्या मजाफाती, वेम, रबी किमया, इराकच्या जबरी जॉर्डन वेली, मेडजूल अंबर, फरद, जायदी आदी खजूरांचा समावेश आहे. यांच्या किंमती व्हरायटीनूसार 100 ते बाराशे रूपयांपर्यंत किलो अशा आहेत.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे रमजान साजरा करण्यावर मर्यादा होत्या. यंदा निर्बंध नसल्यामुळे मुस्लिम बांधवामध्ये उत्साह आहे. रमजानसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. यामध्ये प्रामुख्याने खजूरांची मोठी उलाढाल होत आहे.
खजूराचे दर असे (किलोमध्ये) :
मेदजुल – बाराशे ते सोळाशे रू., सौदी हलवा – 600 रू., इराण मजफाती – 250 ते 350 रू., मब्रूम – 800 रू., वेम, रबी किमीया खजूर – 320 रू., सुखरी खजूर – 500 रू., आजवा खजूर – 1 हजार ते बाराशे रू., कलमी खजुर – 600 ते 700 रू., फरद – 300 रू., जायदी 100 रू.
खजूर सेवनाचे शरीराला होणार फायदे :
श्रावण महिना, नवरात्र व रमजान उपवासासाठीसाठी खजूरांचा वापर केला जातो. खजूरामध्ये भरपुर कॅलरीज असल्यामुळे याचे सेवन शरीरासाठी पोषक आहे. शरीरातील थकवा दुर करणे, ब्लड प्रेशर, बद्धकोष्टता, हृदयाच्या समस्यांशी लढण्यास मदत होते. खजूर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह मिळते. हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होते. यामध्ये भरपुर फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. मधुमेह, कर्करोगाचा धोका कमी हेतो. मेंदु विकारासाठी फायदा हेतो. हृदय आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. नियमित खजूराचे सेवन केल्याने हाडांच्या विकारांचा धोका टळतो. रक्तातील साखर लगेच वाढत नाही. साखर नियंत्रणात ठेवण्यास फायदा हेतो.
दरामध्ये 10 टक्क्यांनी वाढ
यंदा बाजारात 40 प्रकारचे खजूर दाखल झाले आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे रमजान व नवरात्रोत्सवामध्ये म्हणावी तशी उलाढाल झाली नव्हती. यंदा मात्र खरेदीसाठी गर्दी होत आहे. इंधन दरवाढीमुळे दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गुलाम बेलीम, विक्रेता