नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भीमा कोरेगाव प्रकरणाती आरोपी वरवरा राव यांच्या स्थायी जामीन प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने लांबणीवर टाकली आहे. मात्र त्यांच्या अस्थायी जामीनाचा कालावधी वाढविण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत त्यांना हा दिलासा देण्यात आला आहे. वरवरा राव हे 83 वर्षांचे असून यांची प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांना अंतरिम जामीन देण्यात आला होता.
न्या. यु. यु. लळित यांच्या नेतृत्वातील खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. राव यांना देण्यात आलेला अंतरिम जामीन पुढे चालू ठेवल्यास त्याला सरकारी पक्षाचा आक्षेप असणार नाही, अशी भूमिका राष्ट्रीय तपास प्राधिकारणाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मांडली. तसेच त्यांनी पुढील सुनावणीसाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली. राव यांचे वकील आनंद ग्रोव्हर यांनी ते मान्य केल्याने न्यायालयाने अंतरिम जामिनाचा कालावधी पुढील आदेशाप्रमाणे वाढविला आणि पुढील सुनावणी 19 जुलैला होणार असल्याचे स्पष्ट केले.