ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आपल्या खळ्ळ-खट्याक स्वभावामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मोरे यांचा मुलगा रुपेश याच्या चारचाकी गाडीच्या वायपरमध्ये “सावध रहा रुपेश” असा मजकूर लिहिलेली चिट्ठी ठेवण्यात आली होती. रुपेश याने यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, मुलाला मिळालेल्या धमकीमुळे वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी फेसबुक पोस्ट करत धमकी देणाऱ्याला तंबी दिली आहे.
वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुलगा म्हटलं की प्रत्येक बापाचा अभिमान असतो आणि बाप म्हटलं की प्रत्येक पोराचा आयडॉल असतो. आमचंही अगदी तसंच आहे, पण कोणाला तरी हे का खटकतंय तेच समजत नाही. राजकारणात काम करत असताना अनेकदा कळत नकळत कधी कोण शत्रू होतो, तेच समजत नाही. गेले दोन-तीन दिवस झालं बोलू की नको तेच समजत नव्हतं, पण आज ठरवलं तुमच्या सोबत बोललच पाहिजे.
राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या रोजगार मेळाव्याची रुपेश आणि त्याच्या मित्र परिवाराने सर्व तयारी केली, त्याची गाडी त्याने शाळेच्या मैदानात लावली होती. त्या दरम्यान कोणी तरी त्याच्या गाडीच्या वायपरमध्ये “सावध रहा रुपेश” अशी चिठ्ठी लावून ठेवले; जी रात्री घरी आल्यावर पाहिली. तसा तो कोणाच्या आध्यात-मध्यात नसतो तरीही असं का? हाच प्रश्न मनाला चटका लावून जातोय.
आपण रात्रंदिवस जनतेचा विचार करायचा त्यांची कामं करायची आणि कोणी तरी आपल्या कुटुंबाबाबतीत असा विचार करायचा? हे का तेच कळत नाही. भारती विद्यापीठ पोलीस बाकी तपास करत आहेत. तू जो कोणी असशील तो पुसट असा कॅमेऱ्यात दिसतोय. बाबा फक्त इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत (तात्या) मोरे आहे…!”