वास्को : वास्को शहरात सोमवारी संध्याकाळी कार्निव्हल चित्ररथ मिरवणुक हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. स्वतंत्रपथ मार्गाच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी या मिरवणुकीतील चित्ररथांचा आस्वाद घेतला. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने पथके सहभागी झाली होती. वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आमदार दाजी साळकर, वास्को कार्निव्हल उत्सव समितीचे अध्यक्ष व नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स, समितीचे इतर पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत बावटा दाखवून कार्निव्हल मिरवणुकीला प्रारंभ केला. कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीला वर्षपध्दतीप्रमाणे वास्कोतील सेंट अॅण्ड्य्रू चर्चसमोरील हुतात्मा चौकातून सुरूवात झाली. संपूर्ण गोव्यातील पथकांचा या मिरवणुकीत समावेश होता. गोव्यातील परंपरेवर आधारीत विविध चित्ररथ सहभागी झाले होते. स्वतंत्र पथ मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून हजारो नागरिकांनी या मिरवणुकीचा आस्वाद घेतला.
जोशी चौकात उभारलेल्या व्यासपीठावर मंत्री माविन गुदिन्हो, आमदार दाजी साळकर, वास्को कार्निव्हल उत्सव समितीचे अध्यक्ष व नगराध्यक्ष लिओ रॉड्रिग्स, समितीचे इतर पदाधिकारी, किंग मोमो व क्वीन मोमो उपस्थित होते. कार्निव्हल चित्ररथ मिरवणुक शांततेत व उत्साहात पार पडली. मिरवणुकीत भारतीय नौदलाचा चित्ररथही सहभागी झाला होता. चित्ररथ मिरवणुकीला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. प्रथमच रात्री आठ वाजेपर्यंत ही मिरवणुक लांबली. चित्ररथ मिरवणुकीनंतर पालिका इमारतीसमोर ‘म्युझीक बॅण्ड एनएच 17’ लाईव्ह कार्यक्रम पार पडला. आज मंगळवार दि. 21 रोजी सायंकाळी 7 वा. पालिका इमारतीसमोर जॉनी बी गुड व रिझा फर्नांडिस यांचा कार्यक्रम, 8 वा. ओलुव रॉड्रिग्स यांचा संगीताचा कार्यक्रम, 9 वा. गोमंतकीय लोकनृत्य व म्युसिकल ट्रुपतर्फे ‘निझ गोंयकार’ कार्यक्रम तद्नंतर रात्री 9.30 वा. मीमीक्री कलाकार साईदत्त कामत यांचा ‘बॅण्ड ब्लॅक सप्फायर कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होईल.