ऑनलाईन टीम / डेहराडून :
येत्या जुलैपासून सुरू होणाऱ्या प्राथमिक आणि उच्च शिक्षणातील शैक्षणिक सत्रापासून उत्तराखंडमध्ये राष्ट्रीय शिक्षणविषयक धोरण (एनईपी) लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात शैक्षणिक धोरण हे भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित असावे, असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे उत्तराखंडमधील शाळांमध्ये आता वेद, रामायण आणि गीता शिकवली जाणार आहे. याबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. उत्तराखंडचे शिक्षणमंत्री धनसिंह रावत (dhansingh rawat) यांनी यासंदर्भात माहिती दिली.
धनसिंह रावत म्हणाले, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भारतीय इतिहास आणि परंपरांच्या आधारे तयार करण्यात यावा, असा सरकारचा मानस आहे. वेदपुराण, रामायण आणि गीता यांच्यासोबत स्थानिक लोकभाषांना प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणून उत्तराखंडमधील शाळांमध्ये भारतीय ज्ञानपरंपरेवर आधारित शिक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असे नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. नवीन अभ्यासक्रमात उत्तराखंड चळवळीचा इतिहासही शिकवला जाणार आहे. तसेच प्राथमिक शाळांमध्ये सुरू असलेल्या पाच हजार अंगणवाडी केंद्रांमध्ये बाल वाटिका सुरू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांच्या रिक्त पदांना येत्या एक महिन्याच्या आत पदोन्नती देण्याचे निर्देश ‘डीपीसी’ला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.