Tarun Bharat

आजपासून वीरराणी कित्तूर चन्नम्मा उत्सवाला प्रारंभ

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई राहणार उपस्थित

प्रतिनिधी/ बेळगाव

वीरराणी कित्तूर चन्नम्मा उत्सव हा राज्यपातळीवर साजरा केला जाणार आहे. यावषी या उत्सवासाठी 2 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सलग तीन दिवस हा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाला पहिल्यांदाच मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. यावेळी पत्रकारांनीही विविध मान्यवरांची आमंत्रण पत्रिकेमध्ये नावे नसल्याबद्दल विचारले. त्यावर कोणाचेही नाव चुकून राहिले असेल तर त्याची दुरुस्ती करू, असे सांगितले. कित्तूर उत्सव केवळ एक दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र याबाबत म्हणावी तशी जनजागृती का झाली नाही? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता कित्तूर उत्सव हा आता राज्यपातळीवरील उत्सव झाला असून बेंगळूर येथे या उत्सवासंदर्भात जनजागृती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

कित्तूर येथे आज विजयज्योतीचे स्वागत

रविवार दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता विजयज्योतीचे स्वागत कित्तूर येथे करण्यात येणार आहे. 9 वाजता जिल्हाधिकाऱयांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. विविध कलापथकांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्तेच केले जाणार आहे.

वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन 10.30 वाजता कन्नड आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री व्ही. सुनीलकुमार यांच्या हस्ते केले जाणार आहे. वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन कित्तूर येथील एपीएमसीच्या मैदानामध्ये होणार आहे. 11 वाजता उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन 10.30 वाजता फलोत्पादन मंत्री मुनीरत्न यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमाला धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, खासदार मंगला अंगडी या उपस्थित राहणार आहेत.

क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन 12 वाजता परिवहनमंत्री आनंद सिंग यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार इराण्णा कडाडी हे उपस्थित राहणार आहेत. सोमवार दि. 24 रोजी महिलांसाठी संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सकाळी 10 वाजता महिला उत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन विजापूर येथील अक्कमहादेवी विश्व विद्यालयाच्या कुलपती प्रा. बी. के. तुळशीमाला यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून निवृत्त प्रा. डॉ. इंदुमती चन्नमिला या उपस्थित असणार आहेत.

रात्री विविध संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

रात्री विविध संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमांचे उद्घाटन केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून इन्फोसिसच्या सुधा मूर्ती या उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दि. 25 रोजी समारोप कार्यक्रम होणार असून सायंकाळी 7 ते रात्री 9.30 पर्यंत समारोप कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला विविध मठांचे महास्वामी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आमदार महांतेश दोड्डगौडर यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या विद्यावती बजंत्री, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदी उपस्थित होते.

Related Stories

क्रिजवाईजतर्फे कर्मचाऱयांच्या मुलांचा गौरव

Amit Kulkarni

बस्तवाड (हलगा) गावात वार पाळणुकीला सुरुवात

Amit Kulkarni

नियमांचे पालन करा, जीव वाचवा!

Amit Kulkarni

उचगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने डॉक्टर योद्धय़ांचा सत्कार

Patil_p

रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱयांकडून दंड वसूल

Amit Kulkarni

उत्तर कर्नाटकातील समस्यांना बगल

Amit Kulkarni