नोंदणी कार्यालय आवारात खोदाई : काम तातडीने संपविण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अस्ताव्यस्त पार्क केलेली वाहने, रस्त्यातच ठेवलेली वाहने, रस्त्यावरील खोदकाम आदी कारणांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रस्त्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. येथील वाहतुकीचा ताण चव्हाट गल्लीत वाढल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रस्ते विकासाला प्रारंभ झाल्याने रस्ते खोदाई सुरू आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळून जाणारी वाहने चव्हाट गल्लीतून मार्गस्थ होत आहेत. या अरुंद गल्लीत वाहनांची गर्दी वाढत आहे. वाढलेल्या वाहतुकीच्या ताणामुळे चव्हाट गल्लीतील रहिवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि नेंदणी कार्यालयाजवळील रस्ता करून तातडीने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांची डोकेदुखी वाढली
वाढत्या वाहन संख्येमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न जटिल बनला आहे. विकासकामांमुळे रस्त्यावरच टाकलेली माती व दगड, रस्त्यावरच पार्क केलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडी नित्याची बाब ठरत आहे. न्यायालय आवारात खोदाई करण्यात आल्याने चव्हाट गल्लीत वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच वाहने रस्त्यावर ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. चव्हाट गल्लीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.