वृत्तसंस्था/ .बाकू (अझरबेजान)
सॅन मॅरिनोचा पुरुष टेनिसपटू डॉम्निको व्हिसिनी आपल्या वयाच्या 50 व्या वर्षी प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत 100 वा (शतकी) सामना खेळण्याचा पराक्रम करणार आहे.
येत्या सप्टेंबरमध्ये व्हिसिनी 51 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. येथे सुरू असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील आईसलँड विरुद्ध गट चारमधील लढतीत पुरुष दुहेरीच्या सामन्यात आईसलँडच्या बोनीफेशियस आणि सिडॉल या जोडीने सॅन मॅरिनोच्या व्हिसिनी आणि त्याचा साथीदार सिमोनी डी लुगी यांचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. या सामन्यातील पराभवाचा कोणताही विपरीत परिणाम सॅन मॅरिनो संघाच्या वाटचालीवर होणार नाही. तरीही, सॅन मॅरिनो संघाने या लढतीतील सलामीचे दोन्ही एकेरी सामने जिंकले आहेत. सॅन मॅरिनोच्या व्हिसिनीने 1993 साली स्लोव्हेनियाविरुद्ध आपले डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील पदार्पण केले होते. चालू आठवडय़ाच्या प्रारंभी व्हिसिनीने डेव्हिस चषक स्पर्धेतील आपल्या 100 व्या सामन्याच्या दिशेने वाटचाल केली होती. व्हिसिनीने आपल्या जवळपास 30 वर्षांच्या टेनिस कारकिर्दीत डेव्हिस चषक स्पर्धेच्या गट 3 मधील लढतीत सेनेगलच्या बेर्थीचा एकेरीच्या सामन्यात 6-7 (4-7), 7-6(7-5), 13-11 असा पराभव केला. त्यानंतर गेल्या बुधवारी व्हिसिनी आणि त्याचा साथीदार डी. रॉसी यांनी दुहेरीच्या सामन्यात अलबेनियाच्या मुडेनी आणि झिली यांचा पराभव केला. डेव्हिस चषक स्पर्धेत हा दुहेरीचा सामना जिंकणारा तो सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला. व्हिसिनीने तीन वर्षांपूर्वी डेव्हिस चषक स्पर्धेतील एकेरीचा सामना जिंकला, त्यावेळी त्याचे वय 47 वर्षे आणि 318 दिवस इतके होते.